Video | ‘तो’ मदत मागत होता अन् लोक कोंबड्या चोरत होते;  वाहनचालकाने सांगितला रडकुंडीला आणणारा अनुभव

धुक्यामुळे आग्रा-लखनौ महामार्गावर सुमारे डजनभर वाहने एकमेकांना धडकली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर, अनेकजण जखमी झाले. यात एका कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहनाचाही सामावेश होता.
Video | ‘तो’ मदत मागत होता अन् लोक कोंबड्या चोरत होते;  वाहनचालकाने सांगितला रडकुंडीला आणणारा अनुभव
Published on

अपघातग्रस्तांना मदत करणे आपण आपले कर्तव्य मानतो. मात्र, सध्या मानवाने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. धुक्यामुळे आग्रा-लखनौ महामार्गावर सुमारे डजनभर वाहने एकमेकांना धडकली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला तर, अनेकजण जखमी झाले. यात एका कोंबड्या वाहून नेणाऱ्या वाहनाचाही सामावेश होता. यावेळी लोकांनी धुक्याचा आणि अपघाताचा फायदा घेत वाहनामधील कोंबड्यांवर डल्ला मारला. काहींनी तर अक्षरश: गोण्यांमध्ये कोंबड्या भरल्या. विशेष म्हणजे, जखमी वाहनचालक मदतीसाठी याचना करत असतानाही ‘कोंबडी चोर’ नागरिकांनी त्याच्याकडे ढुंकुनही बघितले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

वाहनचालक सुनील कुमारने सांगितले की, “आग्रा-कासगंज प्रवास करत असताना धुक्यामुळे अपघात झाला. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले. मी इतर वाहनचालकांसह रस्त्याच्या कडेला उभा राहिलो. जसजशी सकाळ होऊ लागली. तसतसे लोकांनी वाहनातून कोंबड्यांची लूट सुरु केली. वाहन कोंबड्यांनी भरलेले होते. लोकांनी गाड्या थांबवून कोंबड्या चोरल्या. काहींनी गोणीत भरल्या. मी सुरुवातीला त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दीपुढे मी काहीही करु शकलो नाही.” या घटनेमुळे सुनीलचे मोठे नुकसान झाले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने, “आज इनके घर पार्टी होगी”, असे म्हटले. तर दुसऱ्याने,”एक दारुचा पण ट्रक उलटला असता तर यांचा रविवार गोड झाला असता”, अशी भन्नाट कमेंट केली. अन्य एका युजरने, “आपण याला रोजगार नाही म्हणणार?”अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने अनिल कपूच्या नायक सिनेमातील एक फोटो शेअर करत, “Eberybody, सब के सब चोर है साले”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.   

logo
marathi.freepressjournal.in