
नवी दिल्ली : भारतीय ट्रकचालक दिवस-रात्र न थकता वाहन चालवत असतात. यामुळे त्यांच्यावर मोठा ताण येतो. त्यातून अनेक अपघात घडतात. आता केंद्र सरकार वैमानिकांप्रमाणेच ट्रकचालकांसाठीही कामाचे तास ठरवण्यासाठी नवीन धोरण तयार करीत आहे. याअंतर्गत ट्रकचालकांना ८ तासांचीच ड्युटी असणार आहे.
भारतातील ट्रकचालक माल वेळेवर पोहचवण्यासाठी सलग २४ ते ४८ तास वाहन चालवत असतात. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. तसेच त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे पूर्ण झोपून व आराम करून ट्रक चालवण्याचे धोरण तयार केले जात आहे. यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होईल. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी या धोरणावर गंभीरपणे काम करत आहेत.
ट्रकमध्ये बसवणार खास यंत्र
ट्रक उत्पादन करताना त्यात खास यंत्र बसवले जाईल. चालकाला ट्रक चालवण्यापूर्वी आपली विशेष आयडी असलेली चावी त्या यंत्राला लावावी लागेल. यानंतर कोणताही ट्रकचालक एका वेळी ८ तासांपेक्षा अधिक काळ ट्रक चालवू शकणार नाही. आठ तासांनंतर वाहतूक कंपन्यांना ट्रकचालकाला योग्य प्रमाणात विश्रांती देणे गरजेचे राहील. ते न केल्यास विशेष चावीवाला यंत्र ट्रकला अलार्म देईल, तसेच तो ट्रक बंद पडेल. त्यानंतर तो ट्रक दुसऱ्या चालकाला आपल्या विशेष कार्डवाल्या चावीनेच सुरू करावा लागेल.
देशात २२ लाख ट्रकचालकांची कमतरता
केंद्रीय परिवहन खात्याच्या माहितीनुसार, देशात २२ लाख ट्रकचालकांची कमतरता आहे. देशात ट्रकचालकांची कमतरता असल्याने देशातील वाहतूक क्षेत्रात चालकांकडून जादा काम करून घेतले जात आहे, अशी कबुली केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांनी नुकतीच दिली आहे.
नव्या धोरणामुळे वाहतूक खर्चात होणार वाढ
तज्ज्ञांनी सांगितले की, ट्रकचालकांचा कालावधी ८ तास ठरवल्यास मोठ्या पल्ल्याच्या अंतरासाठी अनेक चालक ठेवावे लागतील. त्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होईल व देशभर अधिक ट्रकचालक लागतील.
१,५८७ नवीन चालक प्रशिक्षण केंद्र उघडणार
अनेकदा कंपन्या गरजेसाठी ट्रकचालकाला न थांबता १० ते १२ तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ ट्रक चालवायला लावतात. त्यामुळे ट्रकचालकांला डुलकी लागून रस्ते अपघात होतात. हे टाळण्यासाठी देशाच्या दुर्गम भागात ट्रकचालकांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी देशात १,५८७ प्रशिक्षण केंद्र व संशोधन केंद्रे उघडली जातील.