ट्रकचालकांचा संप मागे: दिवसभर संपाची  सर्वसामान्यांना धग; पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

ट्रकचालकांचा संप मागे: दिवसभर संपाची सर्वसामान्यांना धग; पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

अखेर सरकार आणि ट्रकचालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : नवीन ‘हिट ॲॅण्ड रन’ कायद्यातील कठोर तरतुदीमुळे देशभरातील ट्रक व टँकरचालकांनी चक्काजाम केला होता. यामुळे देशाच्या विविध भागात इंधन व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. सरकारकडून याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर अखेर मंगळवारी रात्री ट्रक आणि टँकरचालकांचा संप मागे घेण्यात आला.

देशात २ हजार पेट्रोल पंपांवर इंधन संपले

भारतातील दोन हजार पेट्रोल पंपांवरील इंधन संपले आहे. येथील पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. चंदीगढ प्रशासनाने पेट्रोल-डिझेल विक्रीवर मर्यादा आणली आहे. दुचाकीला दोन लिटर, तर चारचाकी वाहनाला एका वेळी पाच लिटर पेट्रोल दिले जात आहे. पेट्रोलियम उद्योगाशी संबंधित व्यक्तींनी सांगितले की, सरकारी तेल कंपन्यांनी ट्रकचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन भरले होते. मात्र, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व पंजाबमध्ये काही पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याने इंधन संपले.

ठाण्यात इंधन टंचाई

ठाण्यात मंगळवारी सकाळपासून पेट्रोलची टंचाई होती. ठाण्याच्या तीन पेट्रोल पंपांवर इंधन भरायला वाहनचालकांची गर्दी होती. टँकरचालकांचा संप असल्याने सोमवारी रात्रीपासून इंधन आलेले नाही. अनेक पेट्रोल पंपांनी ‘डिझेल मिळेल, पेट्रोल नाही’, असे बोर्ड लावले आहेत.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला म्हणाले की, नवीन ‘हिट ॲण्ड रन’ कायदा अजूनही देशात लागू झाला नाही. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याशिवाय या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही. आम्ही ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आम्ही नवीन कायद्याची अंमलबजावणी केली नाही. भारतीय न्यायसंहिता १०६/२ ची अंमलबजावणी करण्यापूर्वी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेससोबत त्याची चर्चा केली जाईल. त्यानंतरच अखेर निर्णय घेतला जाईल, असे भल्ला म्हणाले.

देशाच्या विविध भागात इंधन पुरवठा घटू लागल्यानंतर जनतेचे हाल होऊ लागले. विविध पेट्रोल पंपावर पेट्रोलचा खडखडाट झाला. तसेच इंधन पुरवठा कमी पडणार असल्याने वाहनचालकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या. देशात हलकल्लोळ माजल्यावर केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक दिल्लीत झाली.

देशात ‘हिट अॅण्ड रन’चा कायदा लागू झालेला नाही, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे. सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला.

हिट अॅण्ड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रकचालकांच्या संघटनांनी संपाचे हत्यार उपसले होते. या संपामुळे संपूर्ण देशाला दिवसभरात मोठा फटका सहन करावा लागला. या संपामुळे मंगळवारी दिवसभर आणि सोमवारी संध्याकाळपासून अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही पेट्रोल पंपांमधील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला. त्यामुळे नागरिकांवर प्रचंड मनस्तापाची वेळ आली. या संपामुळे मंगळवारी सकाळी भाजीपाला प्रचंड महागला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खूप अडचणीत सापडले होते. अखेर सरकार आणि ट्रकचालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने देशातील सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in