

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील बिघडलेले राजनैतिक संबंध सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडत आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारताचा दौरा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील घनिष्ट मैत्रीमुळे हा दौरा जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
गोर मोदींचे कौतुक करताना म्हणाले की, ट्रम्प आणि मोदी यांच्यात केवळ राजकीय संबंध नसून, एक प्रकारची वैयक्तिक मैत्री आहे. ट्रम्प यांना भारताविषयी नितांत आदर असून, ते लवकरच भारत भेटीसाठी उत्सुक आहेत. ट्रम्प यांच्या या संभाव्य दौऱ्यामुळे संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक मोठे करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरील चर्चा मंगळवारपासून पुन्हा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताला चुचकारण्यासाठी गोर यांचे हे वक्तव्य आले असल्याचे आंतरराष्ट्रीय जाणकार सांगत आहेत. भारत - अमेरिका व्यापार करारावर पुढील चर्चेबाबत मंगळवारी निर्णय घेतला जाईल, असे सर्जियो गोर यांनी म्हटले आहे. गोर यांनी सोमवारी राजदूत म्हणून कार्यभार स्वीकारला.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी दोन दिवसांपूर्वी भारत - अमेरिकेतील व्यापार करार का होऊ शकला नाही, याबाबत भाष्य केले होते. लुटनिक म्हणाले, भारत व अमेरिकेतील व्यापार करार जवळपास पूर्ण झाला होता. परंतु, मोदींनी ट्रम्प यांना एक फोन केला नाही, त्यामुळे व्यापार करार झाला नाही. लुटनिक यांच्या विधानानंतर आता अमेरिकेच्या नव्या राजदूतांनी व्यापार करारावर भाष्य केले आहे.
काय असेल अजेंडा?
सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात 'पॅक्स सिलिका' आणि जागतिक सिलिकॉन पुरवठा साखळीवर विशेष भर दिला जाऊ शकतो. चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी दोन्ही देश सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रात एकत्र काम करण्यावर चर्चा करतील. तसेच, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि सामरिक भागीदारीवरही या दौऱ्यात शिक्कामोर्तब होऊ शकते.
मैत्रीचा परिणाम
ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात झालेला 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला होता. आता पुन्हा एकदा ट्रम्प प्रशासनासोबत भारत आपले आर्थिक आणि धोरणात्मक हितसंबंध जोपासण्यासाठी सज्ज झाला आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये ट्रम्प शेवटचे भारतात आले होते.