
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष संपवण्याचे श्रेय स्वत:कडे घेतले आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी व्यापाराच्या चर्चेतून तोडगा काढण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला आहे.
व्हाइट हाऊसच्या ओव्हल येथील कार्यालयात दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्याशी चर्चा करताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात आम्ही काय केले ते पाहिले, तर ते सर्व प्रकरण (दोन्ही देशातील संघर्ष) पूर्णपणे मिटवले आणि मला वाटते की ते व्यापाराच्या चर्चेतून मिटवले. आम्ही भारतासोबत मोठा करार करत आहोत. आम्ही पाकिस्तानसोबत मोठा करार करत आहोत.
दोघांशीही संपर्क
ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचे कौतुकही केले. ट्रम्प म्हणाले की, पाकिस्तानात काही चांगले लोक आहेत आणि काही खूप चांगले, महान नेते आहेत. भारत, मोदी हे माझे माझे मित्र आहेत. ज्यावर रामाफोसा यांनी “मोदी हे आपल्या दोघांचेही मित्र आहेत” असा प्रतिसाद दिला. यावर ट्रम्प म्हणाले की, “ते एक अत्यंत चांगले व्यक्ती आहेत आणि मी दोघांना कॉल केला. हे काहीतरी चांगले आहे.
दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाबाबत ट्रम्प यांनी यापूर्वी देखील असेच विधान केले होते. अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभर झालेल्या चर्चेनंतर मला हे जाहीर करायला आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रविरामावर सहमती झाली आहे, असे ते म्हणाले होते.