Donald Trump Tariffs: "फक्त ८ तास झालेत, अजून बरंच काही पाहायला मिळेल"; भारतावर ५० टक्के टॅरिफनंतर ट्रम्प यांची पुन्हा धमकी

भारताशिवाय अन्य देशही रशियाकडून तेल आयात करीत आहेत, मग फक्त भारतावरच टॅरिफचा बडगा का उगारण्यात आला?, असा थेट सवाल बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

भारताशिवाय अन्य देशही रशियाकडून तेल आयात करीत आहे, मग फक्त भारतावरच टॅरिफच्या कारवाईचा बडगा का उगारण्यात आला, असा थेट सवाल बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला धमकीवजा इशारा दिला.

भारतावरील टॅरिफमध्ये आणखी २५ टक्क्यांची वाढ करून एकूण टॅरिफ दर ५० टक्के केल्यानंतर ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आली आहे.

अजून तर फक्त आठच तास झालेत

चीनसारखे अन्य काही देश देखील रशियाकडून कच्चे तेल आयात करीत आहेत, तरीही फक्त भारतावरच टॅरिफचा बडगा का उगारण्यात आला? असा प्रश्न ट्रम्प यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, "अजून तर फक्त आठच तास झालेत. पाहूया काय होतं ते. तुम्हाला अजून बरंच काही पाहायला मिळेल. अनेक दुय्यम (secondary) निर्बंध तुम्हाला पाहायला मिळणार आहेत," अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली.

चीनवरही लागणार निर्बंध

चीनवरही अशीच कारवाई होणार का? या प्रश्नावर, "होऊ शकते. मला माहित नाही, मी आताच सांगू शकत नाही. पण भारतावर ती (कारवाई) केली आहे. अजून काही देशांवरही केली जाणार आहे, त्यातला एक चीन असू शकतो." असे ट्रम्प म्हणाले.

सुरूवातीला ३० जुलै रोजी भारतावर २५% शुल्क लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा २५ टक्के अतिरिक्त कर लादला. म्हणजेच अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के ‘टॅरिफ’ लावल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी २५ टक्के टॅरिफ आकारण्यास आजपासून (दि.७) सुरूवात झाली आहे. तर, अजून २१ दिवसांनंतर अर्थात २७ ऑगस्टपासून उर्वरित अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ अर्थात तब्बल ५० टक्के कर आकारण्यास सुरूवात होणार आहे. याचा भारतीय अर्थव्यस्थेला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

भारतीय बाजारपेठेसाठी ट्रम्प यांचे दबावतंत्र

अमेरिकेत तयार होणाऱ्या उत्पादनांना सहजपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळावा यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतावर त्यांनी आयात शुल्क लागू करण्याबाबत केलेली घोषणा त्या दबावतंत्राचाच एक भाग आहे. यापूर्वी दबावतंत्राचा भाग म्हणून चीनसह अन्य देशांवरही अमेरिकेने प्रचंड ‘टॅरिफ’ लादले होते. मात्र, नंतर ते मागे घेतले किंवा निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in