...तर आणखी ‘टॅरिफ’ लावू! ट्रम्प यांची भारताला धमकी; भारत-पाक युद्ध थांबविल्याचा पुनरुच्चार

भारताने रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यास भारतावर आणखी ‘टॅरिफ’ लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
...तर आणखी ‘टॅरिफ’ लावू! ट्रम्प यांची भारताला धमकी; भारत-पाक युद्ध थांबविल्याचा पुनरुच्चार
Published on

एअर फोर्स वन विमानातून : भारताने रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यास भारतावर आणखी ‘टॅरिफ’ लावण्याची धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ‘पंतप्रधान मोदी यांनी मला सांगितले होते की, ते रशियन तेलाची आयात थांबवतील, पण ते जर तेल घेणे थांबवणार नसतील तर त्यांना आणखी मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले जाईल, असे ट्रम्प यांनी ‘एअर फोर्स वन’ या विदेश दौऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानात पत्रकारांना सांगितले.

गेल्या आठवड्यात बुधवारी व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी मोदींशी चर्चा झाल्याचा दावा केला होता. भारत हळूहळू रशियन तेलाची आयात थांबवणार असल्याचे मोदींनी सांगितल्याचे ट्रम्प म्हणाले होते. ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही, भारत हळूहळू तेल घेणे बंद करेल, असेही ते म्हणाले. मात्र, ट्रम्प यांनी मोदींशी चर्चा झाल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच भारताने हा दावा खोडून काढला होता. अमेरिकी अध्यक्षांनी केलेल्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले की मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून कोणताही संवाद झालेला नाही. भारत तेल आणि नैसर्गिक वायूचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे यालाच सरकारचे प्राधान्य राहिले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते.

भारताच्या तेल आयातीमुळे रशियाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आणि तो रशियाकडून युक्रेन युद्धासाठी वापरला जातो, असा आरोप ट्रम्प सुरुवातीपासून करत आले आहेत. भारत आपले एक तृतीयांश तेल रशियाकडून आयात करतो. असे सांगून ट्रम्प ही आयात थांबविण्यासाठी भारत आणि इतर देशांवर दबाव टाकत आले आहेत. भारताच्या रशियन तेल आयातीमुळे रशियन युद्धयंत्रणेला इंधन मिळत असल्याचा अमेरिकेने दावा केला असून भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर रशियाचे उत्पन्न कमी होईल आणि युक्रेन - रशियामधील युद्ध संपेल, असा ट्रम्प यांचा विश्वास आहे. ट्रम्प प्रशासनाने अनेक भारतीय वस्तूंवर यापूर्वीच अभूतपूर्व ५० टक्क्यांनी शुल्क लादले आहे.

युद्धात सात विमाने पाडल्याचा दावा

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबविल्याचा दावाही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला. दोन्ही देशांमधील युद्धाच्या वेळी सात विमाने पाडण्यात आली, असेही ते म्हणाले. मात्र कोणत्या देशाची ही विमाने होती त्याबद्दल ट्रम्प यांनी वक्तव्य केले नाही.

२०० टक्के टॅरिफची धमकी : टॅरिफ लादण्याच्या धमकीमुळेच भारत आणि पाकिस्तानला युद्ध थांबविणे भाग पडले, असेही ते म्हणाले. दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत, टॅरिफच्या धमकीमुळेच युद्ध थांबले अन्यथा अणुयुद्ध झाले असते, असेही ते म्हणाले. आपण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर २०० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली, त्यामुळे दोघांनाही व्यवहार करणे अशक्य होईल, अमेरिका तुमच्यासमवेत व्यापार करणार नाही, असेही आपण सांगितले आणि त्यानंतर २४ तासांत आपण युद्ध थांबले, असा दावाही ट्रम्प यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in