१०० दिवसांत प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न – मोदी

देशाचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी आपल्या तिसऱ्या सरकारच्या राजवटीच्या पहिल्या १०० दिवसांत सरकारने प्रत्येक क्षेत्र आणि घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले.
१०० दिवसांत प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न – मोदी
PTI
Published on

गांधीनगर: देशाचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी आपल्या तिसऱ्या सरकारच्या राजवटीच्या पहिल्या १०० दिवसांत सरकारने प्रत्येक क्षेत्र आणि घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले. केवळ भारतीयच नव्हे, तर संपूर्ण जग २१ व्या शतकात भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहे, असेही मोदी म्हणाले.

गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या ग्लोबल रीन्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट अॅण्ड एक्स्पो (री-इन्व्हेस्ट २०२४) च्या कार्यक्रमात ते बोलत होते. पहिल्या १०० दिवसांत तुम्ही सरकारचा प्राधान्यक्रम, वेग आणि श्रेणी पाहू शकता. देशाचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी आम्ही प्रत्येक क्षेत्र आणि घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भारताचे वैविध्य, श्रेणी, क्षमता, कामगिरी विलक्षण आहे, असे ते म्हणाले.

पुढील १००० वर्षांचा पाया

पुढील एक हजार वर्षांसाठी विकासाचा पाया रचण्याची भारत तयारी करीत आहे. भारत उच्चपदावर पोहोचावा यावरच केवळ लक्ष केंद्रित नाही तर त्याच स्थानावर कायम राहावा याचाही प्रयत्न आहे. आपल्यासाठी हरित भवितव्य आणि नेट झीरो हे केवळ शब्द नाहीत तर ती देशाची गरज आहे आणि ते साध्य करण्यास आम्ही बांधिल आहोत. देशातील १४० कोटी जनतेने भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याची शपथ घेतली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

गेल्या १०० दिवसांच्या कारकीर्दीत आपला अवमान करण्यात आला आणि खिल्ली उडविण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपण या कालावधीत सरकारने ठरविलेले कार्यक्रम पार पाडले. प्रत्येक भारतीय देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना नकारात्मकता ठासून भरलेल्या व्यक्ती देशाचे ऐक्य बाधित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपली खिल्ली उडविली तरी जनतेसाठी आपण त्याग करीत आलो आहोत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान दुर्बल - काँग्रेस

मोदी सरकारच्या तिसऱ्या कालावधीला १०० दिवस पूर्ण होत असतानाच काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी हे दुर्बल पंतप्रधान असून त्यांचे सरकार कुबड्यांचा आधार घेऊन तिसऱ्यांदा सत्तेवर आले असून या सरकारने यू-टर्न घेण्याचा विक्रम केला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मोदींकडे देशाच्या समस्येवर ना तोडगा आहे ना दृष्टिकोन हेच १०० दिवसांनी सिद्ध केले आहे, असे काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनात यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद, गांधीनगरला जोडणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन अहमदाबाद आणि गांधीनगर यांना जोडणाऱ्या मेट्रो रेल्वे विस्तारित टप्पा-२चे मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोदी यांनी या गाडीला हिरवा कंदील दाखविला आणि त्यामधून प्रवासही केला. या वेळी मोदी यांच्यासमवेत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल होते. जेव्हा २१ व्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी भारतातील सौरक्रांतीचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला - जाईल, असेही ते म्हणाले.

नागपूरहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू गडकरींनी मानले मोदींचे आभार

वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, नागपूरहून वंदे - भारत एक्स्प्रेस सुरू केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे आभार - मानले आहेत. नागपूरहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी आपण करीत होतो आणि रेल्वेने ती पूर्ण केली त्याबद्दल मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेही - गडकरी यांनी आभार मानले आहेत.

नामकरण

रेल्वे मंत्रालयाने उद्घाटन करण्यापूर्वीच भुज-अहमदाबाद वंदे मेट्रोचे 'नमो भारत रॅपिड रेल' असे नामकरण केले.

तिरस्काराने पछाडलेले देशाची बदनामी करण्यातच मग्न

देशातील काही जणांना तिरस्कार आणि नकारात्मकतेने पछाडले आहे आणि तेच देशाची बदनामी करीत आहेत, असा टोला मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नामोल्लेख न करता लगावला. मोदी यांच्या हस्ते आठ हजार कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते अहमदाबाद येथे बोलत होते. भुज-अहमदाबाद नमो भारत रॅपिड रेल्वे, पहिली वंदे भारत मेट्रो सेवा आणि पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना मोदी यांनी हिरवा कंदील दाखविला.

logo
marathi.freepressjournal.in