
भारतात तुर्कीविरोधात सुरू झालेल्या 'बॉयकॉट तुर्की' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आता तुर्कीतील काही माध्यमांनी आणि तज्ज्ञांनी भारतावर निशाणा साधलाय. "जर तुर्कीनेही हाच पवित्रा घेतला, तर त्याचा मोठा आर्थिक फटका भारतालाच सहन करावा लागेल", असा दावा करत धमकीवजा इशारा त्यांनी दिलाय.
"जर तुर्कीनेही भारताशी व्यापार थांबवला, तर भारताचे आर्थिक नुकसान अधिक होईल", असा दावा तुर्कीतील काही माध्यमांनी तेथील तज्ज्ञांच्या हवाल्याने केला आहे. या तज्ज्ञांच्या मते, तुर्की भारताला दरवर्षी फक्त १.३ अब्ज डॉलर मूल्याच्या सामानाची निर्यात करते, तर भारताकडून ६.४ अब्ज डॉलरच्या सामानाची आयात करते. म्हणजेच, तुर्कीची भारताशी सुमारे ५ अब्ज डॉलर परकीय व्यापार तूट आहे. त्यामुळे भारताला मोठा फटका बसेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
भारतीय आकडे वेगळे
तथापि, भारतीय आकडेवारीनुसार, मागील वर्षी तुर्कीहून भारतात सुमारे २.७ अब्ज डॉलर मूल्याच्या सामानाची आयात झाली होती. यामध्ये खनिज इंधन आणि मौल्यवान धातू यांचा मोठा वाटा होता. फक्त वस्त्र क्षेत्रातीलच आयातीचा आकडा ८१ दशलक्ष डॉलरवर होता, अशी माहिती Reuters ने Trading Economics च्या हवाल्याने दिली आहे.
पर्याय सहज उपलब्ध आहेत
भारतातून येणाऱ्या अनेक वस्तूंचे स्थानिक पर्याय सहज उपलब्ध आहेत किंवा त्या अन्य बाजारातून मिळवता येऊ शकतात. आपण जर भारताला एक वस्तू विकतो, तर सहा वस्तू त्यांच्याकडून विकत घेतो. जर आपणही बहिष्कार टाकला, तर नुकसान भारताचेच होईल, असे तुर्कीतील पुराणमतवादी इस्लामी दैनिक Yeni Akit ने काही निर्यातदारांची प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. तुर्कीच्या एकूण $२६१.९ अब्ज निर्यातीतून फक्त ०.५% भारतात जाते, त्यामुळे व्यापारावर फारसा परिणाम होणार नाही. जरी व्यापारावर परिणाम झाला, तरी लगेचच पर्यायी बाजारांतून नुकसान भरून काढता येईल, असेही येथील सरकार समर्थक दैनिकाने म्हटले आहे. मात्र या ‘पर्यायी बाजारपेठा कोणत्या असणार याचं कोणतंही ठोस उदाहरण त्यांनी दिलेलं नाही.
पर्यटनावर परिणाम झालाय, पण जास्त नाही- तुर्की मीडिया
पर्यटनाच्या बाबतीत, व्हिसा प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म Atlys च्या माहितीनुसार, तुर्की आणि अझरबैजानसाठी व्हिसा अर्जांमध्ये ४२ टक्के घट झाली आहे. काही तुर्की माध्यमांनी ही घसरण मान्य केली असली, तरी “मर्यादित नुकसान” असल्याचा दावा केला आहे. एकूण पर्यटनामध्ये केवळ ३.३ लाख पर्यटकांची घट होईल, त्यापेक्षा जास्त नाही असाही दावा येथील माध्यमांनी केलाय.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर ऑपरेशन सिंदूरअंतर्गत केलेल्या कारवाईनंतर तुर्कस्तानने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. शिवाय, भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला ड्रोन देखील पुरवले होते. त्यामुळे चिडलेल्या भारतीय नागरिकांकडून तुर्कीवर जमेल त्या सर्व प्रकारे बहिष्कार टाकण्याची जोरदार मोहिम सुरू आहे. तुर्कीच्या सफरचंदांपासून ते पर्यटन सेवांपर्यंत, भारतीय ग्राहक तुर्कीशी संबंधित सर्व गोष्टींना विरोध दर्शवत आहेत. परिणामी, तुर्कीला आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रात फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.