
काही महिन्यांपूर्वी जगातील प्रसिद्ध उद्योगपती ईलॉन मस्क यांनी ट्विटरचे मालकी हक्क विकत घेतले. तेव्हापासून ट्विटरवर घडणाऱ्या घडामोडी आणि ईलॉन मस्क यांची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, आज अनेकांनी पुन्हा एकदा ट्विटर डाऊन (Twitter Down) झाल्याची तक्रार सोशल मीडियावर तसेच ट्विटरवरदेखील केली. यानंतर #TwitterDown चा ट्रेंड सुरू झाला. महत्त्वाचे म्हणजे इलॉन मस्क यांनी मालकी घेतल्यापासून आतापर्यंत चौथ्यांदा ट्विटर डाऊन झाले आहे.
यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ट्विटरची सेवा काही तासांसाठी बंद झाली होती. त्यावेळीही ट्विटर वापरकर्त्यांना कोणताही नवीन मेसेज दिसत नव्हता किंवा ते कोणतीही नवीन पोस्ट करु शकत नव्हते. इलॉन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेकदा ट्विटरवर तांत्रिक समस्यांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण, यामुळे इतर सोशल मीडियावर ट्विटरवरून आणि इलॉन मस्क यांचे अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.
नुकतेच ट्विटरने २०० जणांना कामावरून घराचा रास्ता दाखवला. याआधीही ट्विटरने हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. उत्पादन व्यवस्थापक, अभियंते आणि डेटा सायंटिस्ट विभागातील लोक २०० कर्मचाऱ्यांमध्ये आहेत ज्यांनी आपली नोकरी गमावली आहे. ब्लू व्हेरिफिकेशन सबस्क्रिप्शनच्या प्रमुखालाही कंपनीतून काढून टाकण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच ट्विटरच्या सेल्स विभागातील मुख्य पदावर काम करणाऱ्यालाही नोकरी गमवावी लागली आहे.