हिंदू तरुणाशी लग्न करण्यावरून वाद; अफगाणी बहिणींची उच्च न्यायालयात याचिका

हिंदू तरुणाशी लग्न करण्यावर आक्षेप घेतलेल्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका निर्माण झालेल्या दोघा अफगाणी बहिणींनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
हिंदू तरुणाशी लग्न करण्यावरून वाद; अफगाणी बहिणींची उच्च न्यायालयात याचिका
Published on

मुंबई : हिंदू तरुणाशी लग्न करण्यावर आक्षेप घेतलेल्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका निर्माण झालेल्या दोघा अफगाणी बहिणींनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

कुटुंबीयांच्या सांगण्यावरून दिल्लीतील अधिकाऱ्यांनी दाखल केलेला फौजदारी खटला बंद करण्याचे निर्देश द्या, अशी विनंती करत त्यांनी दाखल केलेल्या याचिकेची न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने दखल घेत सुनावणी २८ जानेवारी रोजी निश्चित केली आहे.

अफगाणिस्तानातून दोघी बहिणी २०१७ मध्ये शरणार्थी म्हणून भारतात आल्या. त्यांच्याकडे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने जारी केलेले निर्वासित ओळखपत्र देखील आहेत. त्यापैकी एकीने हिंदू विधीनुसार हरयाणातील पुरुषाशी विवाह केला. भारतात निर्वासित म्हणून राहत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नाही.

सुरुवातीला त्यांनी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात पोलीस संरक्षणासाठी याचिका दाखल केली. त्यानुसार त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले. दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये पतीला कर्करोग झाल्याचे आढळल्याने त्या मुंबईत स्थलांतरित झाल्या. याचदरम्यान त्यांना कुटुंबीयांकडून धमक्याही देण्यात आल्या. तसेच कुटुंबीयांनी दोघींविरुद्ध दिल्लीमध्ये फौजदारी खटलाही दाखल केला. हा खटला बंद करण्याची विनंती याचिकेतून केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in