तामिळनाडूतील अपघातात ४ ठार, २८ जखमी ; टायर फुटल्याने दोन बसची समोरासमोर धडक

मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली
File Photo
File Photo

तामिळनाडूच्या कुडालोर जिल्ह्यात सोमवारी दोन बसची समोरासमोर धडक होऊन ४ जण मरण पावले आणि २८ जण जखमी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

कुडालोरकडे जाणाऱ्या बसचे पुढील टायर मेलपट्टमपक्कम गावाजवळ अचानक फुटल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती बस समोरून येणाऱ्या दुसऱ्या खासगी बसवर आदळली. दुसरी बस तिरुवन्नमलाईकडे जात होती. अपघातात दोन्ही बसचे चालक आणि दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अन्य २८ प्रवासी जखमी झाले. अपघात इतका जबरदस्त होता की, दोन्ही बसमधील अनेक प्रवासी आसनांवरून बाजूला फेकले गेले.

मुख्यमंत्री स्टालिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, गंभीररीत्या जखमींना प्रत्येकी ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच राज्याचे कृषिमंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम आणि कायदा मंत्री सी. व्ही. गणेशन यांना रुग्णालयात जाऊन जखमींना योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in