
पाटणा : नेपाळमार्गे छुप्या रस्त्याने भारतात एका महिन्यात दुसऱ्यांदा घुसखोरी केलेल्या दोन चिनी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बिहारमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना शनिवारी अटक केली.
शनिवारी पूर्व चंपारण जिल्ह्यात मोडणाऱ्या रेक्झॉल सीमेवरील एका पोस्टवर एस. के. सिंग नावाच्या अधिकाऱ्याने त्यांना अटक केली. त्यांची उलटतपासणी करीत असताना त्यांनी आपली नावे झाओ झिंग आणि फू काँग असल्याचे सांगितले. दोघेही चीनमधील जाओशिंग परगण्यातील रहिवासी आहेत. त्यांच्याजवळ कोणतीही वैध प्रवासासंबंधित कागदपत्रे सापडली नाहीत. त्यांनी आपले पासपोर्ट सीमेपलीकडील बीरगंज येथेच सोडून आल्याचे सांगितले. आदल्या रात्री ते त्याच ठिकाणी राहिले होते. सीमेपर्यंत ते ऑटोरिक्षाने आले व त्यानंतर पायीच सीमा पार करण्याचा प्रयत्न केला. आधीच्या नोंदीनुसार यांनी २ जुलै रोजी देखील असाच भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांना प्रवेश नाकारून त्यांचा पासपोर्ट हवाली करण्यात आला होता. त्यांनी आता पुन्हा तसाच प्रयत्न केल्यामुळे संशय बळावला आहे. परिणामी त्यांना पुढील चौकशीसाठी स्थानिक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.