पंतप्रधान मोदींच्या युट्यूब चॅनेलचे दोन कोटी सबस्क्राईबर्स ;जागतिक विक्रम प्रस्थापित

नरेंद्र मोदी मीडियावर आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या प्रत्येक दैनंदिन घटनांची माहिती ते शेअर करतात.
पंतप्रधान मोदींच्या युट्यूब चॅनेलचे दोन कोटी सबस्क्राईबर्स ;जागतिक विक्रम प्रस्थापित
PM

नवी दिल्ली : जागतिक लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटना जगभरातून प्रतिसाद मिळत असतो. आता मोदींच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब करणारी बातमी समोर आली आहे. मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने तब्बल २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पार करणारे ते पहिले जागतिक राजकीय नेते ठरले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका अहवालानुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, नरेंद्र मोदी यांना तब्बल ७६ टक्के रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीतील डेटाच्या आधारे जारी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेझ मॅन्युअल, तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट, ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत. त्यामुळे, लोकप्रिय नेते असतानाही मोदींच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्याही लक्षवेधी आहे.

नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन आत्तापर्यंत २३ हजार व्हिडिओ अपलोड केले आहेत. या सबस्क्राईबर्सच्या संख्येसह मोदींनी सोशल मीडियावर नवीन विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. युट्यूबवर २ कोटी सबस्क्राईब असलेले जगातील पहिले राजकीय नेते बनण्याचा बहुमान मोदींना मिळाला आहे.

सोशल मीडियावर सतत सक्रिय

नरेंद्र मोदी मीडियावर आणि सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या प्रत्येक दैनंदिन घटनांची माहिती ते शेअर करतात. त्यासोबतच, विविध कार्यक्रमातील सहभाग आणि जाहीर भाषणांचे प्रक्षेपणही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन केले जाते. एक्सवर नरेंद्र मोदींचे म्हणजेच ९ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. तर, फेसबुकवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मिलियन्समध्ये आहे. आता, त्यांनी युट्यूबवरील सर्वाधिक सबस्क्राईबर्स असलेला राजकीय नेता होण्याचा लौकिक मिळवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in