
उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये दोन दलित अल्पवयीन बहिणींची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. गळा दाबून ठार मारण्यात आल्यानंतर या हत्याकांडाला आत्महत्येचे रूप देण्यासाठी या दोन्ही मुलींचे मृतदेह आरोपींनी झाडाला लटकवले. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, यापैकी एक आरोपी जुनैद हा चकमकीत जखमी झाला आहे.
बुधवारी सायंकाळी ४च्या सुमारास तीन आरोपींनी दलित समाजातील सातवी आणि दहावीतील विद्यार्थिनी असलेल्या या दोन्ही अल्पवयीन मुलींना घराबाहेरून दुचाकीवर बसवून नेले. पोलीससूत्रांच्या माहितीनुसार, ५च्या सुमारास सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हत्येला आत्महत्येचा रंग देण्यासाठी पाच आरोपींनी मिळून त्यांचे मृतदेह झाडाला टांगले. हत्येनंतर हे तरुण पसार झाले. काही वेळातच या आरोपींची भेट या मुलींचा शेजारी असलेल्या छोटूशी झाली.
त्यांनी छोटूला संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि आपल्या गावाकडे गेले. रात्री ९च्या सुमारास नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केला. त्यानंतर मुलींच्या वडिलांनी शेजारी राहणाऱ्या छोटूवर कटात सहभागी असल्याचा आरोप केला. तेव्हा छोटू आपल्या मित्रांची भेट घेऊन घरी शांतपणे झोपला होता. आपला कुणालाही संशय येणार नाही, असा त्याचा समज होता; पण पोलिसांनी त्याला घरातूनच उचलले.
पोलिसांनी छोटूला खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. छोटूनेच पोलिसांना सोहेल, जुनैद व हफीजुलर्रहमान यांचे मोबाइल क्रमांक दिले. पोलिसांनी ते सर्विलांसवर टाकले. हे आरोपी रात्री १०.३०च्या सुमारास आपापल्या घरी गेले. तिथे त्यांनी आरामात कपडे बदलले व जेवण केले.
२४ तासांत पोलिसांनी आरोपींना केले गजाआड
तिघांनी मध्यरात्री १२ च्या सुमारास गावाबाहेर भेटण्याचे ठरवले. सोहेल आपल्या दुचाकीवरून सर्वप्रथम गावाबाहेर पडला. त्यानंतर हफीजुलर्रहमान व करीमुद्दीन आला. हे सर्व जण गाव सोडण्यासाठी आपल्या इतर दोन सहकाऱ्यांची वाट पाहत होते. तेव्हाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रात्रीच आरिफच्या मुसक्या आवळल्या. यादरम्यान जुनैद संधी साधून पसार झाला. पोलिसांनी जुनैदचा माग काढला असता त्याचे लोकेशन गावातीलच एका उसाच्या शेतात आढळले. पोलिसांनी तिथे सर्च ऑपरेशन सुरू केले. सकाळी ८च्या सुमारास पोलिसांनी त्याला घेरले असता त्याने फायरिंगची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला असता एक गोळी त्याच्या पायात शिरली. नंतर पोलिसांनी जुनैदला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून एक गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त केली आहेत.
लग्नासाठी दबाव टाकल्याने हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बहिणींच्या शेजारी राहणारा आरोपी छोटू याच्यामार्फत या दोन्ही मुलींची आरोपीशी ओळख झाली होती. आरोपी मुलींना आमिष दाखवून शेतात घेऊन गेले होते. तिथे त्यांच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवण्यात आले. बलात्कारानंतर दोन्ही बहिणींनी लग्नासाठी दबाव टाकला असता आरोपींनी दोघींचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोघींचेही मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुलींचे मृतदेह झाडाला लटकवण्यात हफिजुल, आरिफ आणि करीमुद्दीन यांनी मदत केल्याचे सांगण्यात आले.
सध्या चौकशी प्राथमिक टप्प्यात आहे. दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम करण्यात येत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. सध्या याप्रकरणी बलात्कार, खून आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.