जोधपूर : जम्मू-काश्मीरमधील एका तरुणीसोबत वेगवेगळ्या राज्यांतील दोन तरुणांनी लग्न झाल्याचा दावा केल्याची अनोखी प्रेमकथा चर्चेत आहे. या प्रकरणात राजस्थानचाही थेट संबंध आहे. राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील दोन तरुणांनी संबंधित तरुणीसोबत लग्न केल्याचा दावा केला आहे. एकाने राजस्थानमध्ये तर दुसऱ्याने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात या तरुणीसोबत लग्न केल्याचा दावा करत याचिका दाखल केल्या आहेत.
जम्मू -काश्मीरमधील अनंतनाग येथील शकीला अख्तर हिचा काही काळापासून राजस्थान पोलीस शोध घेत आहेत. डीडवाना-कुचामन (राजस्थान) जिल्ह्यातील बरडवा पोलीस ठाणे परिसरातील सुदरासन गावातील रहिवासी जितेंद्र सिंह यांनी राजस्थान उच्च न्यायालय, जोधपूर मुख्यपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे.
फिरोजपूर येथे लग्न केल्याचा जितेंद्र सिंह यांचा दावा
जितेंद्र सिंह यांनी दावा केला की, त्यांनी शकीलासोबत १६ फेब्रुवारी २०२५ रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथे लग्न केले होते. त्यांनी याचिकेत लग्नाशी संबंधित कागदपत्रे आणि लिव्ह-इन सर्टिफिकेटही सादर केले. त्यांनी शकीलाला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. जितेंद्र सिंह यांच्या याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालय, जोधपूर येथे सुनावणी प्रस्तावित आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती फरजंद अली यांच्या न्यायालयात सूचीबद्ध आहे. यासाठी डीडवाना येथील बरडवा पोलीस ठाण्याचे एसएचओ महेंद्रसिंह हे आतापर्यंतच्या तपासाच्या कागदपत्रांसह न्यायालयात उपस्थित राहतील.
जम्मूमध्ये शकीलासोबत जवळीक वाढली
जितेंद्रच्या म्हणण्यानुसार, तो एका कंपनीत कंत्राटावर काम करण्यासाठी जम्मू येथे गेला होता. तेथे शकीलासोबत जवळीक वाढली. कुटुंबाच्या संमतीने दोघांनी फिरोजपूर (पंजाब) येथे लग्न केले आणि एकत्र राहू लागले. नंतर शकीलाच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर जम्मू पोलिसांनी दोघांना पकडले आणि ते शकीलाला जम्मू येथे घेऊन गेले. तेथे शकीलाने त्याच्या विरोधात कोणतेही विधान दिले नाही. तरीही तिला त्याच्यासोबत पाठवले नाही. त्यानंतर जितेंद्रने राजस्थान उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
पुढील सुनावणीला तरुणीला हजर करण्याचे निर्देश
राजस्थान उच्च न्यायालयात पहिली सुनावणी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी झाली होती. त्याच दिवशी न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावून पुढील सुनावणीला तरुणीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. ३० ऑक्टोबर २०२५ ते २३ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान या प्रकरणाची सुनावणी ७ वेगवेगळ्या तारखांना झाली आहे. सर्वात नवीन आदेश २३ फेब्रुवारी २०२६ चा आहे, ज्यात सरकारी वकिलांनी तरुणीला शोधण्यासाठी न्यायालयाकडून थोडा अधिक वेळ मागितला. त्यानंतर न्यायमूर्ती अरुण मोंगा आणि न्यायमूर्ती योगेंद्र कुमार पुरोहित यांच्या न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी याच महिन्यात निश्चित केली.
सीआरपीएफला मदतीचा आदेश
दरम्यान, न्यायमूर्ती विनीत कुमार माथुर आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर शर्मा यांच्या खंडपीठाने २९ जानेवारी २०२६ रोजी तपास अधिकाऱ्याला निर्देश दिले होते की, त्यांनी त्या परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि इतर निमलष्करी दलांच्या (पॅरा मिलिटरी फोर्सेस) मदतीने युवतीचा शोध घ्यावा.
जम्मू हायकोर्टात प्रकरणाची सुनावणी
तर दुसरीकडे, जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात शकीला आणि शब्बीर अहमद खान यांच्याशी संबंधित प्रकरणाची सुनावणी १३ मार्च रोजी होईल. शकीला पोलिसांना सापडलेली नाही. जोधपूर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, बरडवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सीआरपीएफच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये शकीलाचा शोध घेतला, परंतु तिचा कोणताही सुगावा लागला नाही. पोलिसांनी अनंतनागसह अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. मात्र, शकीलाही सापडली नाही आणि शब्बीर अहमद खानचाही पत्ता लागला नाही.
अनोखी प्रेम कहाणी विचित्र वळणावर
ही अनोखी प्रेम कहाणी विचित्र वळणावर आली असून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर उच्च न्यायालयात शब्बीर अहमद खानने याचिका दाखल केली. त्याने शकीला ही आपली पत्नी असल्याचे सांगत दोघांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. त्याने न्यायालयात निकाहनामा सादर केला, ज्यात दावा केला की १२ जून २०२४ रोजी दोघांचा निकाह झाला होता. याचिकेत म्हटले आहे की, त्यांचे कुटुंबीय हा निकाह मोडण्याचा प्रयत्न करत आहेत.