

नवी दिल्ली : देशाला साधारणपणे एक दिवस पुरेल इतका स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा करणारी 'पाईन गॅस' आणि 'जग वसंत' ही दोन भारतीय ध्वजवाहक जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुखरूप बाहेर पडली असून येत्या दोन दिवसांत ही जहाजे भारतीय किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.
शिप ट्रॅकिंग डेटा आणि अधिकृत माहितीनुसार, सोमवारी सकाळी या दोन्ही जहाजांनी पर्शियन आखातातून आपला प्रवास सुरू केला. 'लारक' आणि 'केशम' या इराणच्या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलमार्गाचा वापर करून या जहाजांनी सामुद्रधुनी पार केली. जहाजांची ओळख पटवावी आणि कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी इराणच्या अधिकाऱ्यांनी हा मार्ग निवडण्यात आल्याचे समजते. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी पत्रकार सांगितले की, या दोन जहाजांमधून सुमारे ९२,००० टन एलपीजी आणला जात आहे. खाडी देशांतून भारतात पोहोचण्यासाठी या जहाजांना साधारण अडीच दिवसांचा कालावधी लागतो, आता ही जहाजे मार्गस्थ झाली आहेत.
सध्याची स्थिती
युद्धाच्या सुरुवातीला २८ भारतीय जहाजे या भागात होती. सध्या पश्चिम बाजूला २२ आणि पूर्व बाजूला २ जहाजे अद्याप अडकून आहेत. या जहाजांवर सुमारे ६०० भारतीय खलाशी असून, त्यांच्यासाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
तपासणीनंतरच परवानगी
विश्लेषकांच्या मते, इराण या महत्त्वाच्या जलमार्गातून निवडक जहाजांनाच जाण्याची परवानगी देत आहे. जहाजाची मालकी, त्यातील माल आणि ते जहाज अमेरिकेशी संबंधित नाही ना, याची खातरजमा केल्यानंतरच त्यांना पुढे जाण्यास मुभा दिली जात आहे.