
रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथे दोघा बहिणींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. पीडित मुलींपैकी एक अल्पवयीन आहे.
या दोघी तरुणी त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीसह गुरुवारी रात्री उशीरा रक्षाबंधनाचा कार्यक्रम करून दुचाकीवरून घरी परतत होत्या. शहरात प्रवेश करताना त्यांना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अडवले. या तिघांनी तरुणींकडील पैसे आणि मोबाइल फोन लुटले. त्यानंतर काही वेळातच तेथे बाइकवरून आणखी चार जण आले. त्या सर्वांनी तरुणींच्या सोबत असलेल्या पुरुषाला मारहाण करून पळवून लावले. त्यानंतर तरुणींना धमकी देऊन त्यांच्या बाइकवर बसायला भाग पाडले आणि निर्जनस्थळी घेऊन गेले. तेथे या सर्वांनी दोन्ही तरुणींवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यांना मारहाण करून तशाच अवस्थेत सोडून सर्वजण पळून गेले. तरुणींनी कसेबसे पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी दहा संशयितांना अटक केली आहे. त्यातील मुख्य संशयिताचे नाव पूनम ठाकूर असे असून त्यावर यापूर्वीही खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यासाठी तो तुरुंगवासही भोगून आला आहे. काही दिवसांपूर्वीच तो आणखी एका बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला होता.