इंफाळ : मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले, तर चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली.
जखमींना पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी रिम्स रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून बिष्णुपूरला जात होते. तेव्हा नंबोल सबल लाईकाई परिसरात संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी वाहनावर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हल्लेखोरांनी अचानक जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यामुळे जवानांच्या एका वाहनाचे नुकसान झाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले आहे. तीनपैकी एका जखमी जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यामुळे राज्यातील सुरक्षा परिस्थितीबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाली आहे.