इस्रायली दूतावास स्फोटातील दोन संशयित सीसीटीव्हीत कैद

दिल्ली पोलीस विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, दूतावासाजवळ सापडलेल्या पत्रात इस्रायलबद्दल आणि त्यांच्या राजदूतांबद्दल अपमानजनक भाषेत मजकूर लिहिला आहे
इस्रायली दूतावास स्फोटातील दोन संशयित सीसीटीव्हीत कैद
PM

नवी दिल्ली : नवी दिल्लीतल्या चाणक्यपुरी परिसरात असलेल्या इस्रायली दूतावासाच्या मागे एका इमारतीतल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री मोठा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. स्फोटानंतर स्पेशल सेलचे पथक आणि बॉम्बशोधक पथकाने दोन-तीन तास संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली. परंतु, स्फोटाशी संबंधित कोणतीही गोष्ट पोलिसांच्या हाती लागली नाही. विशेष म्हणजे, स्फोट झाला त्याच्या काही अंतरावर पोलिसांना एक निनावी पत्र आढळले असून त्यात इस्रायलच्या राजदूतांचे नाव आहे. तसेच या पत्रात एक झेंडादेखील गुंडाळण्यात आला होता. पोलीस या पत्राच्या अनुषंगाने तपास करत आहे.

दरम्यान, पोलिसांनी या परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये पोलिसांना दोन संशयित व्यक्ती आढळल्या आहेत. एनएसजी आणि एनआयएची दोन पथके तसेच दिल्ली पोलीस या दोन व्यक्तींचा शोध घेत आहेत. पोलीस अजूनही इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासत आहेत. ते दोन संशयित कुठून आले आणि कुठे गेले याचा तपास करत आहेत.

मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने दिल्ली अग्निशमन दलाला फोन करून कथित स्फोटाबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. इस्रायली दूतावासाच्या मागे असलेल्या एका रिकाम्या फ्लॅटमधून स्फोटाचा आवाज आला. आसपासच्या तीन-चार जणांनी हा आवाज ऐकला. दरम्यान, या हल्ल्याची कोणीही जबाबदारी घेतलेली नाही. तसेच हा स्फोट का करण्यात आला? त्यात कुणाचा हात आहे, याचा शोध सुरू आहे.

दिल्ली पोलीस विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, दूतावासाजवळ सापडलेल्या पत्रात इस्रायलबद्दल आणि त्यांच्या राजदूतांबद्दल अपमानजनक भाषेत मजकूर लिहिला आहे. हे पत्र टाईप केलेले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in