'एआय समिट'मध्ये आंदोलन युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय चिब यांना अटक

दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘एआय इम्पॅक्ट समिट’दरम्यान शर्टलेस आंदोलन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी भारतीय युवा काँग्रेसचे प्रमुख उदय भानू चिब यांना अटक केली.
'एआय समिट'मध्ये आंदोलन युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय चिब यांना अटक
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘एआय इम्पॅक्ट समिट’दरम्यान शर्टलेस आंदोलन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मंगळवारी भारतीय युवा काँग्रेसचे प्रमुख उदय भानू चिब यांना अटक केली.

टिळक मार्ग पोलीस ठाण्यात चिब यांना सोमवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते आणि २० तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. चिब तपासामध्ये सहकार्य करीत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्टलेस निदर्शने केल्याप्रकरणी पोलिसांनी ग्वाल्हेरमधूनही आणखी तीन जणांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

या आरोपींविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या ‘एफआयआर’मध्ये गटांमध्ये शत्रुत्व वाढविणे आणि राष्ट्रीय अखंडतेला बाधा पोहोचविणे यासह अन्य आरोपांचा समावेश करण्यात आला आहे.

हुकूमशाही प्रवृत्ती, भ्याडपणाचे लक्षण - राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चिब यांच्या अटकेवर भाष्य केले आहे. युवक काँग्रेसच्या माझ्या ‘बब्बर शेर’ सहकाऱ्यांचा मला अभिमान आहे आणि शांततापूर्ण आंदोलन हा आमचा ऐतिहासिक वारसा आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे. चिब आणि अन्य सहकाऱ्यांना अटक करणे हे हुकूमशाही प्रवृत्ती, भ्याडपणाचे लक्षण आहे. काँग्रेस पक्ष आणि आपण सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in