

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील ३२ बनावट विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. देशात शिक्षणाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. देशातील बनावट विद्यापीठांचे जाळे आता १२ राज्यांमध्ये पोहोचले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा तर दिल्लीतील तब्बल १२ विद्यापीठांचा समावेश (दिल्लीमधील १० व नवी दिल्लीतील २ विद्यापीठे) आहे.
बनावट विद्यापीठांच्या यादीनुसार, दिल्लीनंतर उत्तर प्रदेशात सर्वाधिक ४ बनावट विद्यापीठे आहेत. गेल्या दोन वर्षांत देशातील अशा संस्थांची संख्या २० वरून ३२ झाली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थी आणि पालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रवेश घेताना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
सर्वाधिक बनावट विद्यापीठे दिल्लीत
या नवीन आकडेवारीनुसार, बनावट विद्यापीठांचे जाळे नवीन चार राज्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामध्ये हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे ३२ बनावट विद्यापीठांपैकी तब्बल १२ एकट्या दिल्लीत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यातील काही संस्था यूजीसी मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर आहेत. नवीन आकडेवारीनुसार, दिल्लीत १२, उत्तर प्रदेशात ४ तर केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी २, तर हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आढळून आले आहे.
शहरांपासून लहान खेड्यांपर्यंत बनावट संस्था
जर एखादा विद्यार्थी कुठे प्रवेश घेत असेल तर त्याने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन बनावट विद्यापीठांची यादी तपासावी, असे आवाहन यूजीसीने विद्यार्थी आणि पालकांना केले आहे. तर दुसरीकडे यूजीसी फक्त बनावट विद्यापीठांची यादी जाहीर करते पण त्यावर प्रभावी कारवाई करत नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात दोन विद्यापीठे बनावट
या बनावट यादीत महाराष्ट्रातील दोन विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामध्ये राजा अरबी विद्यापीठ, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे. देशातील बनावट संस्था किंवा विद्यापीठे परदेशी विद्यापीठांची नावे आणि लोगो वापरून स्वतःला वैध ठरवण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच, कोलंबिया विद्यापीठाने यूजीसीला पत्र लिहून तक्रार केली आहे की महाराष्ट्रात त्यांचे नाव आणि लोगो वापरून एक बनावट विद्यापीठ कार्यरत आहे. त्यानंतर, यूजीसीने पुन्हा विद्यार्थी आणि पालकांना इशारा दिला.
विद्यापीठांवर यूजीसीची कारवाई नाही
गेल्या काही दिवसांपासून यूजीसीकडून बनावट विद्यापीठांची फक्त यादी जाहीर केली जात आहे. पण त्या विद्यापीठांवर यूजीसी कारवाई करताना दिसत नाही. आताच काही दिवसांपूर्वी यूजीसीने प्रसिद्धीपत्रक काढून बंगळुरूमधील ‘ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठात प्रवेश घेऊ नये, अशी माहिती दिली होती.