धक्कादायक! मेट्रोचा खंड कोसळून लहान मुलासह आईचा मृत्यू

दुचाकीवरून जाताना मेट्रोचा खांब अंगावर पडल्याने चिमुकल्यासह आईचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी
धक्कादायक! मेट्रोचा खंड कोसळून लहान मुलासह आईचा मृत्यू

काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये मेट्रोचे काम चालू असताना एका महिलेच्या अंगावर गर्डरची लोखंडी प्लेट पडली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई, वडील आणि अडीच वर्षांचा मुलगा दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर मेट्रोचा खांब पडला आणि यामध्ये आईसह चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय तेजस्विनी आपल्या पती आणि अडीच वर्षांच्या लहान मुलासह दुचाकीवरून जात होते. नागवारा येथे पोहोचताच अचानक एक काम चालू असलेला मेट्रोचा खांब त्यांच्या अंगावर पडला. यामध्ये चिमुकल्यासह आईचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मेट्रोचे सुरु असलेले काम आणि सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

बंगळुरू पूर्वचे पोलिस उपायुक्त भीमाशंकर गुलेड यांनी माहिती दिली की, "हे कुटुंब हेब्बलच्या दिशेने जात होते. या दरम्यान, मेट्रोचा खांब ओव्हरलोड झाल्याने त्यांच्या अंगावर कोसळला. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करणार आहेत." तसेच, बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अंजुम परवेझ यांनी पीडितांच्या नातेवाईकांना २० लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in