छठ महापर्वाला ‘युनेस्को’चा टॅग मिळवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न! नरेंद्र मोदींची बिहारमध्ये घोषणा

केंद्र सरकार छठ पूजा महोत्सवाला थेट ‘युनेस्को’चा टॅग मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील निवडणूक प्रचारसभेत केली.
छठ महापर्वाला ‘युनेस्को’चा टॅग मिळवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न! नरेंद्र मोदींची बिहारमध्ये घोषणा
Published on

छपरा/मुझफ्फरपूर : केंद्र सरकार छठ पूजा महोत्सवाला थेट ‘युनेस्को’चा टॅग मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथील निवडणूक प्रचारसभेत केली. दरम्यान, देशातील दोन मोठ्या प्रस्थापित व भ्रष्ट कुटुंबांमधील युवराज सतत मला शिव्या देत असतात, गरीब घरातून व मागासवर्गीय समाजातून पुढे आलेली व्यक्ती त्यांना बघवत नाही, अशी टीकाही मोदी यांनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचा नामोल्लेख न करता केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बिहारमध्ये प्रचारसभेदरम्यान भाजपवर परखड शब्दांत टीका केली होती. भारतीय जनता पक्ष मतांच्या राजकारणासाठी सणांचा वापर करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर २४ तासांच्या अवधीत मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मोदींनी बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी घेतलेल्या सभेमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. आमचे सरकार छठ पूजा उत्सवाला ‘युनेस्को’चा टॅग मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. छठ पूजेला जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असताना काँग्रेस व राजदचे नेते मात्र छठमातेचा अवमान करत आहेत. मला सांगा, कुणी मतांसाठी छठमातेचा अपमान करू शकते का, बिहार आणि भारत हे सहन करेल का, छठ पूजेच्या दिवशी उपवास करणाऱ्या माता हे सहन करतील का, राजद व काँग्रेस किती निर्लज्ज आहेत. त्यांच्यासाठी ही पूजा म्हणजे ड्रामा आणि नौटंकी आहे. तुम्ही अशा लोकांना शिक्षा करणार की नाही, अस मोदी व्यासपीठावरून म्हणाले.

काँग्रेस, राजदकडून नेहमीच विश्वासघात

दरम्यान, यावेळी मोदी यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदवरही तोफ डागली. राजदने नेहमीच बिहारचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस आणि राजदने काय केले आहे बिहारसाठी? जंगलराजच्या लोकांनी काय केले आहे? त्यांच्या कार्यकाळासाठी पाच शब्द आहेत. कट्टा (गावठी बंदूक), क्रूरता, कटुता, कुशासन आणि करप्शन, अशा शब्दांत मोदींनी राजदवर टीका केली. बिहारमधील तरुणांना बिहारमध्येच रोजगार मिळेल, असे आश्वासन मोदींनी यावेळी दिले. बिहारचा गौरव वाढवणे, बिहारच्या गोड भाषेला प्रोत्साहन देणे, बिहारची समृद्ध संस्कृती जगभरात नेणे आणि बिहारचा विकास साध्य करणे ही एनडीए व भाजपसाठी प्राधान्याची बाब आहे. राजद व काँग्रेस बिहारला कधीच विकसित करू शकत नाही. अब बिहार का बेटा-बेटी पलायन नहीं करेगा, बिहार में ही काम करेगा, बिहार में ही नाम करेगा, असेही मोदी यावेळी म्हणाले.

दोन युवराज

दरम्यान, देशातील दोन मोठ्या प्रस्थापित व भ्रष्ट कुटुंबांमधील युवराज सतत मला शिव्या देत असतात. गरीब घरातून व मागासवर्गीय समाजातून पुढे आलेला व्यक्ती त्यांना बघवत नाही. मोदी यांनी त्यांच्या भाषणात कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, त्यांनी देशातील प्रस्थापित व बिहारमधील प्रस्थापित कुटुंब असा उल्लेख केला. त्यामुळे त्यांचा रोख हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते तेजस्वी यादव यांच्याकडे होता, असे बोलले जात आहे.

मोदी म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात दोन युवकांची जोडी तयार झाली आहे. हे दोघे स्वतःला युवराज (राजपुत्र) मानतात. या दोन्ही युवराजांनी खोटी आश्वासने देण्याची दुकाने उघडली आहेत. यापैकी एक देशातील सर्वात मोठ्या, प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे, तर दुसरा बिहारमधील सर्वात मोठ्या, प्रस्थापित राजकारणी कुटुंबाचा युवराज आहे. या दोघांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. मात्र, सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. आपल्या गावाकडे अशा लोकांना किंमत नसते. जामिनावर घरी आलेल्या व्यक्तीला सन्मान दिला जात नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.

...ते युवराजांना असह्य

पंतप्रधान म्हणाले, हे लोक माझा द्वेष करतात आणि मला घाणेरड्या शिव्या देतात. कारण माझ्यासारखा माणूस इथे बसलेला त्यांना सहन होत नाही. मागासवर्गातून पुढे आलेला, गरीब कुटुंबातून इथवर आलेला, एकेकाळी चहा विकणारा माणूस इथे पोहोचला आहे ते या लोकांना सहन होत नाही, बघवत नाही.

logo
marathi.freepressjournal.in