Union Budget 2023 : "असा भारत बनवायचा आहे, ज्यात..."; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आज संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Union Budget 2023) सुरुवात झाली आहे. यावेळी काय ध्येय असतील?हे त्यांनी सांगितले.
Union Budget 2023 : "असा भारत बनवायचा आहे, ज्यात..."; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात
@ANI

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणाने (Union Budget 2023) आजपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.

यावेळी त्यांनी आपल्या अभिभाषणात देशातील गरिबी मिटवण्याचे लक्ष असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, "आपल्याला असा भारत घडवायचा आहे की, ज्यामध्ये गरिबी नसेल. २०४७पर्यंत आपल्याला असे राष्ट्र घडवायचे आहे, जे भूतकाळातील अभिमानाशी जोडलेले असेल. तसेच, ज्या राष्ट्रात आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असतील. याशिवाय, जो आत्मनिर्भर असेल आणि आपली मानवतावादी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल. आपल्याला एकही गरीब नसलेला भारत घडवायचा आहे." असे ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुढे त्या म्हणाल्या की, "भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू आहे. फरारी आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्यासाठी, सरकारने फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा संमत केला आहे. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आकांक्षा जागृत केल्या आहेत. आता मूलभूत सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने हे लोक नवी स्वप्ने पाहू शकतात."

त्यानंतर त्या म्हणाल्या की, "भारताने दहशतवादाविरुद्ध उचललेल्या कठोर पावलांची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. यामुळेच आज दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताचे मत महत्त्वाचे मानले जाते." तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोविड काळात सरकारने घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा केली.

त्या म्हणाल्या की, "कोविडकाळात जगभरातील गरिबांसाठी जगणे कसे कठीण झाले होते? हे आपण पाहिले. पण, आपला देश त्या देशांपैकी एक आहे, ज्यांनी गरिबांच्या आयुष्याचे रक्षण करण्यास, कठीण परिस्थितींमध्ये मदत करण्यास प्रथम प्राधान्य दिले. देशातील एकही गरीब रिकाम्या पोटी झोपू नये, याची काळजी घेतली. विशेष म्हणजे, परिस्थिती पाहता सरकारने 'पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने'चा विस्तार करण्याचा निर्णय घेतला, याचा मला आनंद आहे. ही आहे संवेदनशील, गरीब समर्थक सरकारची ओळख. या योजनेचे जगभरातून कौतुक होत आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in