नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) २ लाख ४३ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली गेली, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी दिली. गृहमंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीच्या दमण येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
शहा म्हणाले की, रोजगार मेळाव्यात गेल्या एका वर्षात ९८ हजार ६७६ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती आणि सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांना सीएपीएफमध्ये पदोन्नती देण्यात आली. २०२४ पासून, गृहमंत्रालयाने सीएपीएफसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. सीएपीएफभारतीत एनसीसी प्रमाणपत्रधारकांना बोनस गुण दिले गेले. गेल्या तीन वर्षांमध्ये ३ हजार ५६० एनसीसी प्रमाणपत्रधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. गेल्या दहा वर्षांमध्ये सीएपीएफमध्ये ५४ बटालियन्स तयार करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
काश्मीरसंबंधात त्यांनी सांगितले की, कलम ३७० रद्द करणे हा जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात एक परिवर्तनाचा टप्पा असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्याने विकास, सुरक्षा आणि सामाजिक-आर्थिक परिमाणांमध्ये व्यापक बदल पाहिले आहेत. दगडफेक आणि संघटित हल्ले आता भूतकाळ झाला आहे, असेही शहा म्हणाले.