

चेन्नई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे स्वत:ला राजा समजत असून ते अहंकाराने बोलतात. त्यांनी आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवावे, अशी टीका तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.
लोकसभेत सोमवारी केंद्रीय मंत्री प्रधान यांनी तमिळनाडू सरकारला बेईमान म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, तमिळनाडू सरकार केंद्र सरकारची ‘पीएमश्री’ योजना लागू करण्यासाठी पुढे आले नाही. तुम्ही निधी जारी करणार आहात की नाही? आमच्याकडून जे एकत्रित केले गेले ते तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
स्टॅलिन यांनी धर्मेंद्र प्रधान यांचे पत्र जाहीर केले आहे. त्यात म्हटले की, तमिळनाडूने नवीन शिक्षण धोरण, तीन भाषा धोरण व ‘पीएमश्री’च्या सामंजस्य कराराचा स्वीकार केला नाही. द्रमुक सरकार जनतेच्या विचारांचा सन्मान करून काम करते, तर भाजपचे नेते हे नागपूरच्या विचारांशी बांधलेले आहेत. द्रमुकच्या खासदारांना लक्ष्य केल्याबद्दल प्रधान यांच्यावर टीका केली. केंद्रीय मंत्र्यांनी निधी जारी न करता तमिळनाडूला धोका दिला आहे. तुम्ही तमिळनाडूच्या नागरिकांचा अपमान करत आहात. हे पंतप्रधान मोदींना मान्य आहे का? असा सवाल त्यांनी केला.
द्रमुकच्या सदस्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार आंदोलन केले. तेव्हा लोकसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले.
प्रधान म्हणाले की, तमिळनाडू सरकार ‘बेईमान’ असून ते विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करत आहेत. ‘पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया’ योजना राबवण्यास तमिळनाडू सरकार तयार नाही. एकेकाळी तमिळनाडू सरकार केंद्र सरकारच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला तयार होते. तमिळनाडूचे शिक्षण मंत्र्यांसोबत काही सदस्य आमच्याकडे आले होते. त्यांनी पीएमश्री योजनेला सहमती दर्शवली होती.
आम्ही तमिळनाडूला निधी देण्यास तयार आहोत. पण, ते योजना राबवण्याबाबत कटिबद्ध नाहीत. ते जाणुनबुजून राजकारण करत असून असभ्यपणे वागत आहेत, असे प्रधान म्हणाले.