राज्यसभा निवडणुकीसाठी ४१ जागांवर निवडणूक बिनविरोध

उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या ११ खासदारांपैकी आठ भाजपचे आणि तीन सपाचे
राज्यसभा निवडणुकीसाठी ४१ जागांवर  निवडणूक बिनविरोध

महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि हरयाणामध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडण्याआधी ११ राज्यांतील ४१ जागांवर खासदारांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि छत्तीसगडसह ११ राज्यांमधील खासदार बिनविरोध निवडून आले आहेत.

उत्तर प्रदेशमधून निवडून आलेल्या ११ खासदारांपैकी आठ भाजपचे आणि तीन सपाचे आहेत. भाजपकडून लक्ष्मीकांत वाजपेयी, डॉ. राधामोहनदास अग्रवाल, महिला मोर्चाच्या माजी प्रदेशाध्यक्षा दर्शना सिंह, संगीता यादव, बाबुराम निषाद, राज्यसभा सदस्य सुरेंद्र कुमार नागर, डॉ. के. लक्ष्मण आणि माजी खासदार मिथिलेश कुमार हे खासदार बनले आहेत. सपा आघाडीकडून, जावेद अली, आरएलडीचे जयंत चौधरी आणि सपाला पाठिंबा असलेले कपिल सिब्बल हे बिनविरोध निवडून आले आहेत.

आंध्र प्रदेशातील चार जागांवर निवडून आलेले सर्व खासदार वायएसआर काँग्रेसचे आहेत. यामध्ये विजयसाई रेड्डी, बी. मस्तान राव, आर. कृष्णय्या आणि एस. निरंजन रेड्डी यांचा समावेश आहे.

बिहारमधून पाच जागांवर मतदान न करता भाजपचे दोन, आरजेडीचे दोन आणि जेडीयूचा एक खासदार निवडून आला आहे. भाजपकडून सतीशचंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल, जेडीयूकडून खिरू महतो तर आरजेडीकडून मीसा भारती आणि फयाज अहमद राज्यसभेचे खासदार बनले आहेत.

तमिळनाडूतून सहा खासदार मतदानाशिवाय निवडून आले आहेत. यामध्ये डीएमकेकडून एस कल्याणसुंदरम, आर गिरीराजन आणि केआरएन राजेश कुमार अशी तीन नावे आहेत. एआयएडीएमकेकडून सीव्ही षणमुगम आणि आर. धरमार तर काँग्रेसकडून पी. चिदंबरम निवडून आले आहेत. मध्य प्रदेशात भाजपला दोन तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी भाजपकडून तर विवेक तनखा काँग्रेसकडून निवडून आले. ओडिशातील तीनही जागा बीजेडीच्या असून सुलता देव, मानस रंजन मंगराज आणि सस्मित पात्रा हे खासदार बनले आहेत.

तेलंगणात दोन जागांवर टीआरएसचे बी. पार्थसारधी रेड्डी आणि डी. दामोदर राव तर छत्तीसगडमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि रंजीत रंजन बिनविरोध निवडून आले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे बलबीर सिंह सिचेवाल आणि विक्रमजीत सिंह साहनी राज्यसभेत पोहोचले. झारखंडमध्ये महुआ माझी आणि भाजपच्या आदित्य साहू यांच्या बाजूने गेली. उत्तराखंडमधील भाजपच्या उमेदवार डॉ. कल्पना सैनी राज्यसभेत पोहोचल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in