

नवी दिल्ली : पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे झालेल्या अनपेक्षित पावसाने देशाच्या मोठ्या भागाला व्यापून टाकले आहे. या पावसामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील विक्रीला चालना देणाऱ्या मागणीत व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी वातानुकूलित यंत्रे (एसी) उत्पादकांनी सावधगिरीने पावले टाकण्याची तयारी केली आहे.
अवकाळी पाऊस आणि इतर घटकांमुळे विक्रीवर परिणाम झाल्याने २०२५ हे वर्ष एसी उद्योगासाठी चांगले नव्हते.
पश्चिम आशियातील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे प्लास्टिकसारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच एलपीजी वायूची उपलब्धता मर्यादित असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. प्लास्टिकच्या वाढत्या किमतींमुळे वॉशिंग मशीनसारख्या इतर मोठ्या उपकरणांच्या किमतीही १०-१२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी संकेत दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर, नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीमुळेही या उद्योगात काहीशी अस्वस्थता पसरली आहे.
मार्च महिन्यात सहसा थंडावा देणाऱ्या उत्पादनांची मागणी वेगाने वाढते; परंतु या अनपेक्षित हवामानामुळे उत्पादक काहीसे चिंतेत पडले आहेत. तरीही, एप्रिल महिन्यात तापमान वाढण्याची अपेक्षा असल्याने उद्योग क्षेत्रातील अधिकारी आशावादी आहेत.
एसी बाजारपेठ १३.५ दशलक्षची
भारतीय एसी बाजारपेठ अंदाजे १३.५ दशलक्ष युनिटची आहे. यामध्ये व्होल्टास, एलजी, डायकिन, ब्लूस्टार, हिताची, पॅनासोनिक आणि लॉयड इत्यादी कंपन्यांची स्पर्धा आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीपासून ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो नवीन ऊर्जा मानांकन (एनर्जी लेबलिंग) अनिवार्य केल्यामुळे उद्योगाने यापूर्वीच एकदा दरवाढ केली आहे. एसी उत्पादनातील पेंट शॉप्स उच्च तापमानात वाळवण्यासाठी इंधन म्हणून एलपीजी वापरतात. वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटरसारख्या उपकरणांमध्ये वापरातील प्लास्टिकच्या किमती वाढल्या आहेत.