

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७च्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने काँग्रेसला २६ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. दोन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
दिल्लीतील काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या चर्चेपूर्वी पत्रकारांशी बोलताना यादव यांनी काँग्रेसला २६ जागांचा प्रस्ताव दिल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसने जिंकलेल्या दोन जागा, ज्या जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती अशा चार जागा आणि समाजवादी पक्षाला ६० ते ७० हजार मते मिळालेल्या अन्य २० जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. या २० जागांवर काँग्रेसला सुमारे दोन हजार मते मिळाली होती, असे यादव म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभेत एकूण ४०३ जागा आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागावाटपासाठी चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे.
परस्परविरोधी पक्ष
उत्तर प्रदेशचे मंत्री दयाशंकर सिंह यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष असून, केवळ राजकीय स्वार्थासाठी ते एकत्र येत असल्याचा आरोप केला. अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी युती करून समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या विचारांशी प्रतारणा केल्याचा दावा त्यांनी केला. मुलायमसिंह यांनी काँग्रेसच्या विरोधात समाजवादी पक्षाची स्थापना केली होती, असे सांगत यादव यांनी प्रस्तावित युतीबाबत अखिलेश यादव यांनी जनतेला स्पष्ट भूमिका सांगावी, अशी मागणी केली.