जिवंत असूनही स्वतःचे अंत्यविधी केले; दोन दिवसांनंतरच झाला मृत्यू; गावकरी हैराण

दोन दिवसांपूर्वीच हसत हसत स्वतःच्या मृत्यूचे विधी पार पाडणारी व्यक्ती आज देवाला प्रिय झाल्याने गावकरीही हैराण झालेत.
जिवंत असूनही स्वतःचे अंत्यविधी केले; दोन दिवसांनंतरच झाला मृत्यू; गावकरी हैराण

उत्तर प्रदेशातील एटा येथे जिवंत असूनही स्वतःच्या अंत्यसंस्काराचे विधी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या तेराव्याला शेकडो लोक आले होते. याची परिसरात जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, तो दोन दिवसांनंतरच जगाचा निरोप घेईल याची त्यावेळी कोणालाच कल्पना नसावी. दोन दिवसांपूर्वी हसत हसत स्वतःच्या मृत्यूचे विधी पार पाडणारी व्यक्ती आज देवाला प्रिय झाल्याने गावकरीही हैराण झालेत.

15 जानेवारीलाच अंत्यविधी

एटा येथील रहिवासी असलेले वृद्ध हकीम सिंह यांचे 15 जानेवारीलाच अंत्यविधी पार पडले होते. जिवंत असूनही तेरावा आणि पिंड दान करण्यामागील कारण सांगताना हकीम म्हणाले होते की, "कुटुंबातील सदस्यांवर विश्वास राहिलेला नाही. माझ्या मृत्यूनंतर ते माझ्या अंत्यसंस्काराच्या विधी करतील की नाही मला माहित नाही. त्यामुळे जिवंतपणीच सर्व विधी पार पाडले."

मृत्यूची पूर्वकल्पना होती?

आता या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी हकीम सिंह यांचा मृत्यू झाला आहे. हकीमला मृत्यूची पूर्वकल्पना होती, अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे. हकीम यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात येत असून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला आहे.

800 लोक होते उपस्थित -

साकित शहरातील मुन्शी नगर परिसरातील रहिवासी असलेल्या हकीम सिंह यांनी स्वतःच्या तेराव्यासाठी पत्रक देखील छापले होते, ज्यामध्ये सुमारे 800 लोक उपस्थित राहिले होते. त्याआधी हकीमने तेराव्यासाठी करावयाचे विधीही पूर्ण केले होते.

माहितीनुसार, हकीम यांनी बिहारमधील एका मुलीशी लग्न केले होते. मात्र काही काळ एकत्र राहिल्यानंतर पत्नी त्यांना सोडून माहेरी निघून गेली. हकीम यांना मूलबाळ नसल्याने त्यांच्या कुटुंबाने त्यांची जमीन व घरावर कब्जा केला. नातलगांच्या अशा वागण्यामुळे हकीम त्रस्त झाले होते.

हकीम सिंग यांनी सांगितले होते की, त्यांचे भाऊ आणि नातलग त्यांना घर आणि शेतीसाठी अनेकदा मारहाण करतात. काही दिवसांपूर्वी मारहाणीत त्यांचा हातही मोडला होता. अशा परिस्थितीत माझ्या मृत्यूनंतर ते माझे तेरावे करतील की नाही, याचा विश्वास नाही.

logo
marathi.freepressjournal.in