सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर

"कोरियन हेच ​​आमचं आयुष्य होतं, मग तुम्ही आम्हाला आमचं आयुष्य सोडायला लावायची हिंमत कशी केली? आम्ही तुमच्यावर आणि कुटुंबावर जितकं प्रेम नाही केलं, तितकं आम्ही कोरियन अभिनेत्यावर आणि के-पॉप ग्रुपवर केलं. कोरियन हेच ​​आमचं आयुष्य होतं...
सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर
सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर
Published on

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या १२, १४ आणि १६ वर्षे वयाच्या तीन बहिणींच्या धक्कादायक मृत्यूनंतर, तपासात त्यांचे कोरियन गोष्टींबद्दलचे वेड आणि वडिलांनी त्यांचा मोबाईल फोन काढून घेतल्यावर सुरू झालेली मानसिक अस्वस्थता समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, के-ड्रामा पाहता येत नसल्यामुळे त्या मुली खूप अस्वस्थ आणि मानसिक तणावात होत्या.

१० दिवसांपूर्वी वडिलांना सिक्रेट कोरियन अकाउंट खात्याबाबत समजलं अन्

निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी मृत मुलींची नावे आहेत. त्यांनी सोशल मीडियावर मारिया, एलिझा आणि सिंडी या कोरियन नावांनी खाते तयार केले होते. याबाबत त्यांच्या वडिलांना माहिती नव्हती. तिघींना मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स देखील मिळाले होते. पण, सुमारे १० दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांना या खात्यांबाबत समजले आणि त्यांनी ते खाते डिलीट करून मुलींचे मोबाईल फोनही काढून घेतले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुमारे २ कोटी रुपयांच्या कर्जाखाली दबलेल्या वडिलांनी (चेतन कुमार) वीज बिल भरण्यासाठी मोबाईल विकले. तसेच मुलींना लग्न लावून देण्याची धमकीही दिली होती. यावर मुलींनी, “आम्ही भारतीय नसून कोरियन आहोत, त्यामुळे लग्न करू शकत नाही,” अशी प्रतिक्रिया दिल्याचेही समोर आले आहे.

आत्महत्येमागे कारण काय: टास्क-आधारित कोरियन गेम की आणखी काही?

सुरुवातीला या मुली एका टास्क-आधारित कोरियन गेमच्या प्रभावाखाली होत्या आणि त्यातील शेवटचा टास्क आत्महत्या होता, अशी चर्चा होती. तथापि, बुधवार संध्याकाळपर्यंत पोलिसांनी सांगितले की, त्या मुली कोरियन संस्कृतीमुळे प्रभावित झाल्या होत्या, परंतु केवळ तेच एकमेव कारण नव्हते ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

कुटुंब गंभीर आर्थिक अडचणीतून जात होते आणि गेल्या दोन वर्षांपासून मुली शाळेत जात नव्हत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याचे कारण प्रचंड कर्जाचा बोजा हे होते. वडिलांनी मुलींना पुन्हा शाळेत पाठवण्याची कधीच तसदी घेतली नव्हती.

डायरीतून कोरियन आकर्षणाचा खुलासा

मुलींनी आत्महत्येआधी एक चिठ्ठी मागे सोडली होती, ज्यात लिहिले होते: "या डायरीत जे काही लिहिले आहे ते सर्व वाचा कारण हे सर्व सत्य आहे. आता वाचा... मला माफ करा. सॉरी, पप्पा." त्या चिठ्ठीच्या शेवटी हाताने काढलेला रडणारा इमोजीही होता. आठ पानांची ही चिठ्ठी एका पॉकेट डायरीच्या पानांवर लिहिली होती, ज्यात त्यांच्या गेमिंग आणि मोबाईलवरील ॲक्टिव्हिटीजची सविस्तर माहिती दिली होती.

"कोरियन हेच ​​आमचं आयुष्य होतं...

डायरीतील मजकुरानुसार, मोबाईल काढून घेतल्याने आणि कोरियन शो पाहण्यास मनाई केल्यामुळे त्या वडिलांवर प्रचंड नाराज होत्या. "कोरियन हेच ​​आमचं आयुष्य होतं, मग तुम्ही आम्हाला आमचं आयुष्य सोडायला लावायची हिंमत कशी केली? आम्ही त्यांच्यावर किती प्रेम करत होतो, हे तुम्हाला माहीत नव्हतं. आता तुम्ही पुरावा पाहिलाय. आता आमची खात्री पटली आहे की कोरियन आणि के-पॉप हेच आमचं आयुष्य आहे. आम्ही तुमच्यावर आणि कुटुंबावर जितकं प्रेम नाही केलं, तितकं आम्ही कोरियन अभिनेत्यावर आणि के-पॉप ग्रुपवर केलं. कोरियन हेच ​​आमचं आयुष्य होतं...", असेही त्यांनी नमूद केले. कोरियन आवडत असूनही वडिलांनी भारतीयाशी लग्न लावून देण्याची धमकी दिल्याचा आरोप करत, “आम्ही अशा कोणत्याही गोष्टीची अपेक्षाच केली नव्हती...म्हणूनच आम्ही आत्महत्या करत आहोत. सॉरी, डॅड,” असे त्या नोटमध्ये लिहिले आहे. या प्रकरणाचा अद्याप पोलिसांकडून तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in