नवी दिल्ली : सणासुदीचे दिवस असल्याने मतदानाच्या तारखेमध्ये बदल करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदान तारखांमध्ये सोमवारी बदल केला.
नव्या वेळापत्रकानुसार उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व म्हणजे नऊ, पंजाबमधील चार आणि केरळमधील एका जागेसाठी आता १३ नोव्हेंबरऐवजी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी मात्र २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. केरळमधील पलक्कड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. मात्र, चेलक्करा विधानसभा आणि वायनाड लोकसभा निवडणुकीसाठी पूर्वी घोषित केल्याप्रमाणे १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
विविध सणांमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करीत काँग्रेस, भाजप, बसपा आणि आरएलडी यांनी वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.