"फक्त हाडांचा सांगाडा उरला"; केअरटेकर म्हणून आलेल्या दाम्पत्याने बाप-लेकीलाच घरात डांबले; अमानुष छळामुळे वडिलांचा मृत्यू

नातेवाईक भेटायला आले की, "ओमप्रकाश भेटू इच्छित नाहीत" असे सांगून त्यांना परत पाठवले जात असे, अशी माहिती ओमप्रकाश यांच्या भावाने दिली. सोमवारी ओमप्रकाश यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. घरात पोहोचल्यावर त्यांनी भयावह दृश्य पाहिले.
"फक्त हाडांचा सांगाडा उरला"; केअरटेकर म्हणून आलेल्या दाम्पत्याने बाप-लेकीलाच घरात डांबले; अमानुष छळामुळे वडिलांचा मृत्यू
"फक्त हाडांचा सांगाडा उरला"; केअरटेकर म्हणून आलेल्या दाम्पत्याने बाप-लेकीलाच घरात डांबले; अमानुष छळामुळे वडिलांचा मृत्यू
Published on

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला आणि त्याच्या मानसिक आजारग्रस्त मुलीला घरातील देखरेख करणाऱ्या दाम्पत्यानेच (केअरटेकर) जवळपास पाच वर्षांपासून कैद करून अमानुष छळ केल्याचा खुलासा झाला आहे. या अत्याचारामुळे वडिलांचा मृत्यू झाला असून मुलगी गंभीर अवस्थेत आढळली आहे.

पत्नीच्या निधनानंतर केअरटेकर ठेवले

मृत ओमप्रकाश सिंह राठोड (७०) हे भारतीय रेल्वेतील वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. पत्नीच्या निधनानंतर २०१६ मध्ये ते आपल्या २७ वर्षीय दिव्यांग मुलगी रश्मीसह स्वतंत्र घरात राहू लागले. घरकामासाठी त्यांनी रामप्रकाश कुशवाहा व त्याची पत्नी रामदेवी यांना 'केअरटेकर' म्हणून ठेवले होते.

हळूहळू मिळवला घरावर ताबा

काळानुसार या दाम्पत्याने घरावर पूर्ण ताबा मिळवला. त्यांनी ओमप्रकाश व रश्मीला तळमजल्यावर बंदिस्त केले, तर स्वतः वरच्या मजल्यावर आरामात राहू लागले. या काळात बाप-लेकीला अन्न, औषधोपचार व मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्यात आले. नातेवाईक भेटायला आले की, "ओमप्रकाश भेटू इच्छित नाहीत" असे सांगून त्यांना परत पाठवले जात असे, अशी माहिती ओमप्रकाश यांचे भाऊ अमर सिंह यांनी दिली.

वडिलांचा मृत्यू; मुलगी अर्धमृत स्थितीत

सोमवारी ओमप्रकाश यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. घरात पोहोचल्यावर त्यांनी भयावह दृश्य पाहिले. ओमप्रकाश यांचे शरीर अतिशय कृश अवस्थेत होते. तर रश्मी अंधाऱ्या खोलीत नग्न अवस्थेत, अर्धमृत स्थितीत आढळली. नातेवाईकांनी सांगितले की, उपासमारीमुळे रश्मी केवळ सांगाड्यासारखी दिसत होती. "तिच्या शरीरावर मांस उरले नव्हते, फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक होता," असे पुष्पा सिंह राठोड यांनी सांगितले.

शेजाऱ्यांना जबर धक्का

ओमप्रकाश यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे. एकेकाळी सन्मानाचे जीवन जगणाऱ्या, नेहमी सूट आणि टाय घालणाऱ्या ओमप्रकाश यांची दुर्दशा पाहून शेजाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. ओमप्रकाश हे परिसरात सन्माननीय व आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. सध्या रश्मीला नातेवाईकांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कुटुंबीयांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय व फॉरेन्सिक तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in