विवाहबाह्य संबंधाचा संशय, पत्नीचं शीर धडावेगळं केलं; हातात घेऊन रस्त्याने फिरतानाचा Video व्हायरल

रस्त्यात ज्यांनी कोणी हे दृष्य बघितले त्यांचा थरकाप उडाला. घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
विवाहबाह्य संबंधाचा संशय, पत्नीचं शीर धडावेगळं केलं; हातात घेऊन रस्त्याने फिरतानाचा Video व्हायरल
Published on

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला लागून असलेल्या बाराबंकीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून येथे एका व्यक्तीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. गळा चिरून पत्नीला ठार केल्यानंतर तो तिचे धडावेगळे केलेले शीर हातात घेऊन रस्त्याने फिरत होता. पत्नीचे मुंडके हातात घेऊन तो पोलिस स्थानकातच जात असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, त्याआधीच लोकांनी आणि गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला वाटेतच ताब्यात घेतले. धडावेगळं केलेलं पत्नीचं शीर घेऊन जातानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी बाराबंकीच्या फतेहपूर कोतवाली भागातील बसरा गावात ही घटना घडली. आरोपी अनिल कनौजिया हा मजूर म्हणून काम करतो. आठ वर्षांपूर्वी त्याचे वंदना कनौजिया (वय २७) हिच्याशी लग्न झाले होते. वंदनाचे अन्य पुरूषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिलला होता. त्यावरून दोघांचे वादही होत होते. नुकतीच वंदना भगौली येथे एका लग्न समारंभात गेली होती, जिथे ती दुसऱ्या पुरुषासोबत दिसली, त्यामुळे पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आज सकाळी ८ वाजता अनिल कामावर निघाला पण तासाभरातच ९ वाजण्याच्या सुमारास कोयता घेऊन घरी परतला. घरात घुसून त्याने पत्नीवर कोयत्याने हल्ला केला. काही क्षणातच त्याने कोयत्याने वंदनाचा गळा चिरला. त्यानंतर एका हातात कोयता आणि एका हातात पत्नीचे शीर घेऊन तो रस्त्याने फिरत होता. रस्त्यात ज्यांनी कोणी हे दृष्य बघितले त्यांचा थरकाप उडाला. लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in