Video : "२० दिवसांपासून झोपलो नाही, काम पूर्ण होईना..."; बीएलओ अधिकाऱ्याने केली आत्महत्या

सर्वेश सिंह हे शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि ७ ऑक्टोबर रोजी त्यांची पहिल्यांदाच बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, जो आता व्हायरल झाला आहे.
Video : "२० दिवसांपासून झोपलो नाही, काम पूर्ण होईना..."; बीएलओ अधिकाऱ्याने केली आत्महत्या
Video : "२० दिवसांपासून झोपलो नाही, काम पूर्ण होईना..."; बीएलओ अधिकाऱ्याने केली आत्महत्या X/@ranvijaylive
Published on

मोरादाबाद : निवडणूक मतदार यादी सुधारणा कामाच्या प्रचंड दबावामुळे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे एका ४६ वर्षीय बूथ-लेव्हल ऑफिसरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्वेश सिंह असे या मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

गेल्या काही आठवड्यांमध्ये, अनेक बीएलओ अधिकाऱ्यांनी कामाचा ताण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दबावामुळे आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ११ हून अधिक राज्यांमध्ये मतदार यादी सुधारणा प्रक्रिया सुरू असताना ही घटना घडल्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे.

हृदयद्रावक व्हिडीओ

सर्वेश सिंह हे शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि ७ ऑक्टोबर रोजी त्यांची पहिल्यांदाच बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, जो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते प्रचंड दु:खी आणि हताश दिसत आहेत आणि ढसाढसा रडत आहेत. व्हिडीओमध्ये सर्वेश सिंह यांनी आपल्या आई आणि बहिणीची माफी मागितली आहे आणि त्यांच्या लहान मुलींची काळजी घेण्याची विनंती केली आहे.

आई, माझ्या मुलींची काळजी घे, कृपया मला माफ कर, मी दिलेले काम पूर्ण करू शकलो नाही, मी आता एक कठोर पाऊल उचलणार आहे, मी खूप संकटात आहे. गेल्या २० दिवसांपासून मी व्यवस्थित झोपू शकलो नाही, मला चार लहान मुली आहेत. इतर लोक हे काम पूर्ण करू शकले, पण मी नाही, असे सर्वेश सिंह यांनी म्हटले आहे.

सुसाइड नोटमध्येही उल्लेख

रविवारी पहाटे सर्वेश सिंह यांची पत्नी बबली देवी यांना ते घरातील स्टोअर रूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळावरून जिल्हा बेसिक शिक्षण अधिकाऱ्याला उद्देशून लिहिलेली दोन पानांची सुसाइड नोट पोलिसांना मिळाली आहे. या नोटमध्ये सिंह यांनी एसआयआरचे लक्ष्य वेळेत पूर्ण करू न शकल्यामुळे आलेल्या नैराश्याचा उल्लेख केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in