आग्रा : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या शाळेची भरभराट व्हावी यासाठी हाथरसमधील एका शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा नरबळी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. काळी जादू करून या विद्यार्थ्याचा नरबळी देण्याची योजना होती, मात्र काही कारणास्तव योजना फसल्याने अखेर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे चौकशीनंतर स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी शाळेच्या संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर धक्कादायक घटना घडल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे कुटुंबीय शाळेत पोहोचले तेव्हा शाळेचे संचालक तेथून पसार झाले. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना काही धक्कादायक बाबी उजेडात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ६ सप्टेंबर रोजी अन्य एका विद्यार्थ्याचा नरबळी देण्याची योजना आखली होती. मात्र त्या विद्यार्थ्याने तेथून पळ काढल्याने ती योजना फसली. त्यानंतर शाळेच्या मागील बाजूला असलेल्या कूपनलिकेजवळ मुलाचा बळी देण्याच्या उद्देशाने आरोपीने पुन्हा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला. तेथे जात असताना विद्यार्थ्याला जाग आल्याने आरोपींनी घाबरून त्याची गळा दाबून हत्या केली.
सदर शाळेचे नाव डी. एल. पब्लिक स्कूल असे असून शाळामालकाचे नाव जशोधन सिंह असे आहे. त्याचा जादूटोणावर विश्वास आहे. त्याने आपला मुलगा आणि शाळेचा संचालक दिनेश याला शाळेच्या भरभराटीसाठी नरबळी देण्यास सांगितले. बळी देण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव कृतार्थ असे असून त्याचे प्रा. लक्ष्मण सिंह आणि शिक्षक रामप्रकाश सोळंकी आणि वीरपाल सिंह यांनी वसतिगृहातूनच अपहरण केले.
या घटनेनंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता शाळेतील कूपनलिकेजवळ पूजेच्या वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यामागे अंधश्रद्धा आणि जादूटोणा असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मुलाच्या शवविच्छेदन तपासणीत गळा दाबल्याचे आढळले आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार ज्या शाळेत घडला ती शाळा आर्थिक अडचणीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शाळेची भरभराट व्हावी, हा या हत्येमागील हेतू असावा आणि त्यातूनच नरबळीमुळे शाळेला यश मिळेल, असा समज आरोपींचा असावा, असा संशय पोलिसांना असून या दृष्टीने आता तपास सुरू आहे.
या संपूर्ण घटनेची माहिती देताना मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मला माझ्या मुलाच्या शाळेतून फोन आला होता. तेव्हा सांगण्यात आले की, तुमच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे, त्वरित शाळेत या. यानंतर मी शाळेत जात असतानाच मला पुन्हा फोन आला आणि तुमच्या मुलाची प्रकृती बिघडली असल्याने आम्ही त्याला सादाबादला घेऊन जात आहोत, असे सांगण्यात आले.