यूपीआयची आज दशकपूर्ती; दहा वर्षांत व्यवहारात १३ हजार पटीने वाढ

यूपीआयने प्रत्येक घराघरात स्थान मिळवले आहे. २५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेल्या ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) ला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत.
यूपीआयची आज दशकपूर्ती; दहा वर्षांत व्यवहारात १३ हजार पटीने वाढ
Published on

नवी दिल्ली : २५ रुपयांचा वडापाव...२० रुपयांचा चहा...३०० रुपयांची भाजी...५०० रुपयांची फळे, २ हजार रुपयांचा ड्रेस, रेल्वेचे ३ हजार रुपये तिकीट आदींसाठी भारतीय लोक मोठ्या आत्मविश्वासाने यूपीआय पेमेंट वापरत आहेत. या यूपीआयने प्रत्येक घराघरात स्थान मिळवले आहे. २५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेल्या ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) ला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत.

भारताचे डिजिटल व्यवहार क्षेत्र पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या यूपीआयने संपूर्ण भारतीयांच्या मनात घर केले आहे. रिअल-टाइम व्यवहारांसाठी जागतिक स्तरावर एक आदर्श मापदंड बनले आहे.

वित्त मंत्रालयाने सांगितले की, यूपीआयचे वार्षिक व्यवहार २०१६-१७ मधील १.७८ कोटी होते. २०२५-२६ मध्ये २४,१६२ कोटींहून अधिक झाले आहेत, म्हणजेच यात १३ हजार पटींनी वाढ झाली आहे. याच कालावधीत, व्यवहारांचे मूल्य ०.०७ लाख कोटी रुपयांवरून सुमारे ३१४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असून, त्यात ४ हजार पटींहून अधिक वाढ झाली आहे.

वर्ष २०२६ हे यूपीआयच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. मे २०२६ मध्ये प्रथमच मासिक व्यवहारांची संख्या २,३०० कोटींच्या पार पोहोचली. जुलै २०२६ मध्ये २,३६६ कोटी व्यवहार नोंदवले गेले, जो यूपीआयच्या १० वर्षांच्या प्रवासातील एका महिन्यातील सर्वोच्च व्यवहार संख्या आहे.

डिजिटल विषमता दूर केली

या मंचाने डिजिटल वित्तीय सेवांवरील पोहोच वाढवली आहे, डिजिटल विषमता दूर करण्यास मदत केली आहे आणि देशभरातील नागरिक, व्यवसाय आणि व्यापाऱ्यांना अधिकृत डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभागी होण्यास सक्षम करून वित्तीय समावेशन मजबूत केले आहे. व्यवहार संख्या आणि मूल्य यांमधील समकालीन वाढ भारताच्या दैनंदिन किरकोळ पेमेंट व्यवस्थेतील यूपीआयची मजबूत भूमिका दर्शवते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in