नवी दिल्ली : भारताच्या ‘डिजिटल पेमेंट’ क्रांतीने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. जानेवारी २०२६ मध्ये ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’द्वारे (यूपीआय) होणाऱ्या व्यवहारांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतीयांनी केवळ एका महिन्यात २८.३३ लाख कोटी रुपयांचे २१.७ अब्जाहून अधिक व्यवहार ‘यूपीआय’द्वारे केले.
लहान किरकोळ खरेदीपासून ते मोठ्या रकमेच्या हस्तांतरणापर्यंत, ‘यूपीआय’ हे देशात दैनंदिन व्यवहारांचा कणा बनले आहे, ज्यामुळे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये जागतिक नेता म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. जानेवारी २०२६ मध्ये, ‘यूपीआय’ व्यवहारांनी २८.३३ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला, जो डिसेंबर २०२५ मधील २७.९७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. व्यवहारांच्या संख्येत, हा आकडा २१.७० अब्जांपर्यंत पोहोचला, जो वापरकर्ते आणि व्यवसायांमध्ये ‘यूपीआय’वरील वाढता विश्वास आणि अवलंबित्व दर्शवतो.
दैनंदिन किरकोळ व्यवहारांपासून ते मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीपर्यंत ‘यूपीआय’चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट्स, रुग्णालये तसेच ऑनलाइन खरेदीसाठीही यूपीआय हा प्रमुख पर्याय ठरत आहे. यूपीआयच्या वाढत्या लोकप्रियतेमागे त्याची सुलभ प्रक्रिया, वेगवान व्यवहार आणि सुरक्षितता ही प्रमुख कारणे मानली जात आहेत.
बँक खाते, डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम जवळ नसतानाही केवळ मोबाईल फोनच्या मदतीने काही सेकंदांत पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे शक्य झाले आहे. ‘क्यूआर कोड स्कॅन’ करणे किंवा मोबाईल क्रमांक अथवा यूपीआय आयडी टाकणे एवढाच सोपा टप्पा असल्याने सर्वसामान्य नागरिकांपासून ते लहान व्यावसायिकांपर्यंत ‘यूपीआय’चा स्वीकार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सध्या देशभरात ३५ कोटींपेक्षा अधिक वापरकर्ते आणि ६ कोटींहून अधिक व्यापारी ‘यूपीआय नेटवर्क’शी जोडले गेले आहेत.
ग्रामीण भागातही ‘यूपीआय’ची वाढती क्रेझ
सुट्टे पैसे देणे अवघड होऊन बसल्यामुळे ग्रामीण भागातही आता ‘यूपीआय’ व्यवहारांची क्रेझ वाढू लागली आहे. सरकारी योजना, अनुदान, पगार, पेन्शन यांसारख्या रकमा थेट खात्यात जमा होण्यास ‘यूपीआय’ने मोठी मदत केली आहे. त्यामुळे रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होत असून डिजिटल समावेशनाला चालना मिळत आहे. व्यापाऱ्यांसाठीही ‘यूपीआय’ हे कमी खर्चिक आणि विश्वासार्ह साधन ठरत आहे. कोणत्याही महागड्या मशीनची गरज नसणे, कमी किंवा शून्य शुल्क आणि तत्काळ सेटलमेंट यामुळे लहान दुकानदारही सहजपणे डिजिटल व्यवहार स्वीकारत आहेत.
चालू आर्थिक वर्षात २३० लाख कोटी रुपयांचे व्यवहार
‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’द्वारे होणाऱ्या व्यवहारांनी चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत २३० लाख कोटी रुपयांचा विक्रमी आकडा गाठला आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत अलीकडेच माहिती देताना सांगितले की, “यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे मूल्य वेगाने वाढत आहे. देशांतर्गत व्यवहारांचा विचार केल्यास, २०२५-२६ या वर्षात डिसेंबरपर्यंत एकूण २३० लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. २०२२-२३ या वर्षातील एकूण १३९ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या तुलनेत हा आकडा खूप जास्त आहे.”