
नवी दिल्ली : अदानी लाचखोरी प्रकरण आणि संभल व मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
लोकसभेत दुपारी कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहातील मोकळ्या जागेत धावत गेले आणि त्यांनी घोषणाबाजी करीत अदानी लाचखोरी आणि संभल हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
या गदारोळातच बंदरे आणि जलमार्ग मंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी कोस्टल शिपिंग विधेयक मांडले.
सभागृहात गदारोळ सुरू असताना पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी सदस्यांना शांत राहण्याची सूचना केली. मात्र, विरोधी सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत गोंधळ सुरू ठेवल्याने संध्या रे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभारासाठी तहकूब केले.
दरम्यान, राज्यसभेतही अदानी, संभल हिंसाचार आणि मणिपूरचा प्रश्न विरोधी सदस्यांनी उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.