
नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने सार्वजनिक कंत्राटांमध्ये मुस्लिम कंत्राटदारांना ४ टक्के आरक्षण दिल्यावरून सोमवारी राज्यसभेत बराच गदारोळ माजला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कर्नाटक सरकारचा मुस्लिम आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजपचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनीही या मुद्याचे समर्थन केले. मात्र, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि नड्डा यांच्यात यावेळी जोरदार खडाजंगी उडाली.
संसदेत किरेन रिजिजू यांनी कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. “गरज भासल्यास राज्यघटना बदलण्यासही तयार असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले होते, असा आरोप त्यांनी केला. हे विधान एखाद्या सामान्य व्यक्तीकडून आले असते, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असते, पण घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीचे हे विधान अत्यंत चिंताजनक आहे,” असेही रिजिजू म्हणाले.
“विरोधक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो गळ्यात घालून फिरतात, पण आता ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. संविधान बदलून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची योजना आहे काय?,” अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली. याला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचा संविधानाशी छेडछाड करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे खर्गे यांनी स्पष्ट केले. “भारताची राज्यघटना वाचवण्याचे काम केवळ काँग्रेसनेच केले आहे. राज्यघटना बदलण्याची कोणतीही शक्यता नसून या सर्व अफवा पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे खर्गे यांनी सांगितले.
भाजप नेते जे. पी. नड्डा यांनीही या मुद्द्याला हात घालत ‘हे संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे,' असे सांगितले. “धर्माच्या आधारावर आरक्षण मिळणार नाही, असे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले होते. काँग्रेस संविधान रक्षणाचा ढोल बडवते, पण आता तोच पक्ष संविधान बदलण्याची भाषा करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
फक्त एका धर्माला लक्ष्य केले जात आहे - ओमर अब्दुल्ला
“वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात लोकांमध्ये शंका आहेत. प्रत्येक धर्माशी निगडित धार्मिक संस्था आहेत. ज्या धर्मामध्ये स्वत:च्या धार्मिक संस्था नाहीत, असा एकही धर्म अस्तित्वात नाही. धर्मादाय उपक्रम राबवणारा असा कोणताही धर्म नाही, पण सध्या फक्त एका धर्माच्या संस्थांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यावरून तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे,” असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.