केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची मुदत मे २०२९ मध्ये संपुष्टात येणार होती, असे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सोनी यांचा तडकाफडकी राजीनामा
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची मुदत मे २०२९ मध्ये संपुष्टात येणार होती, असे सूत्रांनी सांगितले.

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण उजेडात आल्यानंतर निर्माण झालेले वाद आणि यूपीएससीवर होत असलेले आरोप यांच्याशी सोनी यांच्या राजीनाम्याचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असेही सूत्रांनी म्हटले आहे.

मनोज सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा १५ दिवसांपूर्वीच दिला असून तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही, असेही सूत्रांनी सांगितले. शिक्षणतज्ज्ञ सोनी यांनी २८ जून २०१७ रोजी आयोगाचे सदस्य म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यानंतर १६ मे २०२३ रोजी त्यांनी यूपीएससीचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि त्यांची मुदत १५ मे २०२९ रोजी संपुष्टात येणार होती.

यूपीएससीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची सोनी यांची इच्छा नव्हती, त्यांनी आपल्याला मुक्त करावे अशी विनंतीही केली होती, तथापि त्यांची विनंती तेव्हा स्वीकारण्यात आली नाही. सोनी यांनी आता सामाजिक-धार्मिक कार्यासाठी अधिक वेळ देण्याचे ठरविले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेला बसण्यासाठी बनावट ओळख सादर करून पात्रतेपेक्षा अधिक वेळा परीक्षेला बसण्याची संधी घेतली. त्यामुळे शुक्रवारी यूपीएससीने खेडकर यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविला आणि भविष्यात खेडकर यांना परीक्षेला बसण्यापासून बंदी घालण्यासाठी पावले उचलल्याच्या पार्श्वभूमीवर सोनी यांच्या राजीनाम्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

वादांमुळेच सोनी यांना दूर केले - खर्गे

नवी दिल्ली : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारण देत पदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेसने मात्र त्यांना दूर करण्यात आल्याचे म्हटले आहे. भाजप आणि रा. स्व. संघ भारतातील घटनात्मक संस्था पद्धतशीरपणे काबीज करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. यूपीएससीमध्ये झालेले अनेक घोटाळे ही राष्ट्रीय चिंतेची बाब आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित मंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. सोनी यांच्या राजीनाम्याबाबत महिनाभर गोपनीयता का पाळण्यात आली, यूपीएससीमधील अनेक घोटाळे आणि राजीनामा यांचा संबंध आहे का, असे सवालही त्यांनी केला. सोनी हे मोदी यांच्या गळ्यातील ताईत होते. त्यांना गुजरातमधून आणण्यात आले आणि यूपीएससीचे अध्यक्षही करण्यात आले, असेही त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in