सर्व उमेदवारांना चेहरा प्रमाणीकरण बंधनकारक UPSC चा महत्त्वाचा निर्णय

लोकसेवा आयोग (यूपीएससी) आयोजित करत असलेल्या सर्व भरती परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आता परीक्षा केंद्रांवर चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) प्रक्रियेतून जावे लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
सर्व उमेदवारांना चेहरा प्रमाणीकरण बंधनकारक UPSC चा महत्त्वाचा निर्णय
Published on

नवी दिल्लीः लोकसेवा आयोग (यूपीएससी) आयोजित करत असलेल्या सर्व भरती परीक्षांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना आता परीक्षा केंद्रांवर चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) प्रक्रियेतून जावे लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

या निर्णयामुळे परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व विश्वासार्हता आणखी बळकट होईल, असे त्यांनी सांगितले. 'यूपीएससीच्या परीक्षांना बसणाऱ्या सर्व उमेदवारांचे परीक्षा स्थळी चेहरा प्रमाणीकरण केले जाईल,' अशी नोंद आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

यूपीएससीकडून नागरी सेवा परीक्षेसह विविध सरकारी पदांसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) आदी सेवांसाठी अधिकारी निवडले जातात.

यूपीएससीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाची चाचणी म्हणून यशस्वी अंमलबजावणी केली होती. ही पायलट योजना १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या एनडीए (नॅशनल डिफेन्स अकॅडमी) आणि एनए (नॅव्हल अकॅडमी) II परीक्षा २०२५ तसेच सीडीएस (कॉम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) II परीक्षा दरम्यान राबवण्यात आली होती.

गुरुग्राममधील निवडक परीक्षा केंद्रांवर ही प्रायोगिक तत्वावर योजना राबवण्यात आली, ज्यात उमेदवारांच्या चेहऱ्यांच्या प्रतिमा त्यांच्या अर्जात सादर केलेल्या छायाचित्रांशी डिजिटल पद्धतीने जुळवण्यात आल्या.

या नव्या प्रणालीमुळे प्रत्येकी उमेदवाराची पडताळणी करण्यास लागणारा वेळ सरासरी केवळ ८ ते १० सेकंदांपर्यंत कमी झाला असून, प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे आणि सुरक्षेचा अतिरिक्त स्तरही जोडला गेला आहे, असे यूपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in