इराक, सीरियात अमेरिकेचे हवाई हल्ले; इराककडून बदल्याची धमकी

इराक आणि सीरियातील ८५ दहशतवादी तळांवर अमेरिकेने शनिवारी हवाई हल्ले केले. इराणचे समर्थन असलेल्या दहशतवादी संघटनांनी गेल्या रविवारी जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला केला होता. त्याचा बदला म्हणून अमेरिकेने ही कारवाई केली आहे.
इराक, सीरियात अमेरिकेचे हवाई हल्ले; इराककडून बदल्याची धमकी

बगदाद : इराक आणि सीरियातील ८५ दहशतवादी तळांवर अमेरिकेने शनिवारी हवाई हल्ले केले. इराणचे समर्थन असलेल्या दहशतवादी संघटनांनी गेल्या रविवारी जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला केला होता. त्याचा बदला म्हणून अमेरिकेने ही कारवाई केली आहे.

इराकने या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत त्यात १६ जण ठार झाल्याचे म्हटले आहे. तसेच अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे या प्रदेशातील स्थैर्यावर विपरीत परिणाम होईल आणि इराक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकीही दिली आहे. इराणनेही अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे दोन्ही देशांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असून त्याने संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचाही भंग झाला असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले. तसेच गेल्या रविवारी जॉर्डनमधील अमेरिकी तळावर झालेल्या हल्ल्यात इराणचा काही संबंध नसल्याचेही स्पष्ट केले आहे. अमेरिकेने हा हल्ला करून घोडचूक केली असल्याचेही इराणने म्हटले आहे.

जॉर्डनमधील हल्ल्याचा सूड

जॉर्डनमधील अमेरिकी सैनिकी तळावर गेल्या रविवारी इराणसमर्थित दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिक मारले गेले होते. त्याचा बदला म्हणून अमेरिकेने शनिवारी ही कारवाई सुरू केली असून ती गरज भासेल तोपर्यंत सुरू राहील, असे अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in