नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार केले. यात जानेवारी २०२५ पासून हद्दपार केलेल्या ३,२५८ भारतीयांचा समावेश आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले.
पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, मानवी तस्करीच्या प्रकरणांची चौकशी राज्यांनी तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केली आहे. यात पंजाबमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. २०२३ मध्ये ६१७ भारतीयांना आणि २०२४ मध्ये १,३६८ भारतीयांना हद्दपार करण्यात आले, असे मंत्र्यांनी सांगितले.
जानेवारी २०२५ पासून अमेरिकेने एकूण ३,२५८ भारतीय नागरिकांना हद्दपार केले आहे. यापैकी २,०३२ भारतीय (अंदाजे ६२.३ टक्के) नियमित व्यावसायिक उड्डाणांनी परतले आणि उर्वरित १,२२६ भारतीय (३७.६ टक्के) यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) किंवा कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) द्वारे चालवल्या जाणाऱ्या चार्टर विमानांनी परतले, असे ते म्हणाले.