
अमृतसर : अमेरिकेचे ‘सी-१७’ हे विमान ११६ अवैध प्रवाशांना घेऊन अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी उतरले. हे विमान रात्री १० वाजता येणार होते. मात्र, रात्री ११.३५ वाजता ते उतरले. अमेरिकेने पाठवलेल्या अवैध भारतीयांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या, तर पायात साखळ्या बांधल्या होत्या. त्यामुळे याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या विमानातून मायदेशी परतलेल्या दलजीत सिंगने सांगितले की, माझ्या पायात साखळ्या व हातात बेड्या घातल्या होत्या. केवळ महिला, मुलांना बेड्या व साखळ्या घातल्या नव्हत्या.
अमेरिकेतून आलेल्या या अवैध प्रवाशांना पोलिसांनी त्यांच्या घरी सोडले. हरयाणा सरकारनेही राज्यातील निर्वासितांची प्रवासाची सोय केली.
दलजीत सिंग हे होशियारपूर जिल्ह्यातील कुराला कला गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, मला डंकी मार्गाने अमेरिकेत पाठवण्यात आले. हा मार्ग अवैध व धोकादायक होता. अमेरिकेत जाण्यासाठी ६५ लाख रुपये खर्च केले.
दलजीत सिंग यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना पहिल्यांदा दुबईला नेण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी दक्षिण आफ्रिकेत पाठवले. तेथे चार ते साडेचार महिने काढले. तेथून आमची रवानगी ब्राझीलला केली. तेथे एक महिना काढल्यानंतर आम्ही दुसऱ्या देशात गेलो. अत्यंत कठीण परिस्थितीतून चिखलातून व टॅक्सीतून प्रवास केला. पनामा देश पार करायला तीन दिवस लागले. त्यानंतर नदी, डोंगर पायदळी तुडवले. मजल-दरमजल करत आम्ही मेक्सिकोला पोहोचलो. अनेक दिवस आम्ही भात खाऊन काढले. आमच्यासोबत १०० जण होते. त्यातील ८ जण भारतीय होते. मेक्सिकोत आम्ही एक महिना काढला. २७ जानेवारीला दलजीतला अवैधपणे अमेरिकन सीमेच्या आत ढकलण्यात आले. मात्र, मला अमेरिकन सीमा गस्ती पथकाने तत्काळ पकडले. त्यानंतर मला डिटेंशन सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे मला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली. मला खोलीच्या बाहेर जायला दिले जात नव्हते. चीप्सचे पाकीट व सफरचंदावर भूक भागवावी लागत होती. एक पाण्याची बाटली दिली जात होती. अत्यंत कमी अन्नात मी दिवस काढले, असे दलजीत यांनी सांगितले.
जमीन परत मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत
माझी जमीन परत मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. तसेच बनावट ट्रॅव्हल एजंटवर कारवाई करावी. तसेच ट्रॅव्हल एजंटच्या भूलथापांना बळी न पडता कोणत्याही अवैध मार्गाने कोणत्याही देशात जाऊ नये, असे आवाहन दलजित यांनी केले.