नवी दिल्ली : आपल्या कंपन्यांचे शेअर्स मूल्य वाढवण्यासाठी अदानी समूहाने अफरातफर केल्याचा आरोप ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या अमेरिकी संस्थेने नव्याने केला आहे. अमेरिकेतीलच हिंडेनबर्गनेही अदानी समूहावर असाच आरोप केला होता. ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर गुरुवारी भारतात वादळ उठले आहे.
हिंडेनबर्गच्या हल्ल्यातून अदानी समूह सावरत असतानाच, ओसीसीआरपी या दुसऱ्या अमेरिकी संस्थेने नव्या आरोपांची राळ उठवली आहे. ओसीसीआरपीने अदानी समूहाच्या मॉरिशसमधील दोन व्यवहारांचा शोध घेतला आहे. यासाठी त्यांनी अदानी समूह आणि संबंधित गुंतवणूकदार यांच्यातील ई-मेलही तपासल्याचा दावा केला आहे. मॉरिशसमार्गे भारतात गुंतवणूक करून अदानी समूहाने आपल्याच पैशाने स्वत:च्या कंपन्यांचे शेअर खरेदी करून समूहातील शेअर्सचे मूल्य वाढवल्याचा आरोप केला आहे. अदानी कुटुंबासोबत जुने आर्थिक हितसंबंध आणि व्यवहार असलेले दोन गुंतवणूकदार, नासर अली शाबान अहली आणि चांग चुंग-लिंग हे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मॉरिशसमार्गे गुंतवणूक करत होते. हे दोघेही गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांच्या काही कंपन्यांमध्ये संचालक आहेत. त्यांच्या मार्फत अदानी कुटुंबीयांनी त्यांचे पैसे विदेशातून भारतात पुन्हा स्वत:च्याच कंपन्यांमध्ये गुंतवून भारतातील कंपन्यांचे मूल्य वाढवल्याचा ओसीसीआरपीचा आरोप आहे. हिंडेनबर्गनेही अदानी समूहावर असाच आरोप केला होता.
जुनेच आरोप
दरम्यान, अदानी समूहाने ओसीसीआरपीचे हे आरोप जुनेच असून त्यांची सेबीमार्फत आधीच चौकशी सुरू असल्याचे अदानी समूहाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. हे सर्व आरोप यापूर्वीच हिंडेनबर्गने केले आहेत. आधीच्या आरोपांमध्ये थोडासा फेरफार करून पुन्हा तेच आरोप नव्याने करण्यात आले आहेत. दशकभरापूर्वीच ज्या प्रकरणांमध्ये काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची चौकशी बंद करण्यात आली होती. त्याच प्रकरणांचा पुन्हा पुन्हा उल्लेख केला जात आहे. ओसीसीआरपी या संस्थेला अमेरिकी अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर बंधू यांचे पाठबळ आहे. हे दोघेही भारतद्वेष्टे आहेत. त्यामुळे त्यांच्या या अहवालामागे भारतद्वेषच असल्याचे अदानी समूहाने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.