अमेरिका, ब्रिटनचे येमेनमध्ये हल्ले; हुथी बंडखोरांचे १३ ठिकाणचे ३६ तळ लक्ष्य

अमेरिका आणि ब्रिटनच्या सेनादलांनी रविवारी येमेनमध्ये हुथी बंडखोरांच्या तळांवर हल्ले केले. दोन्ही देशांच्या हवाईदल आणि नौदलाने १३ ठिकाणी हुथी बंडखोरांच्या एकूण ३६ तळांना लक्ष्य बनवले.
अमेरिका, ब्रिटनचे येमेनमध्ये हल्ले; हुथी बंडखोरांचे १३ ठिकाणचे ३६ तळ लक्ष्य

वॉशिंग्टन : अमेरिका आणि ब्रिटनच्या सेनादलांनी रविवारी येमेनमध्ये हुथी बंडखोरांच्या तळांवर हल्ले केले. दोन्ही देशांच्या हवाईदल आणि नौदलाने १३ ठिकाणी हुथी बंडखोरांच्या एकूण ३६ तळांना लक्ष्य बनवले. हुथी बंडखोरांनी गेल्या काही दिवसांत तांबड्या समुद्रात इस्रायलच्या मित्रदेशांच्या जहाजांवर केलेल्या ड्रोनहल्ल्यांना उत्तर देण्यासाठी हे हल्ले करण्यात आले.

हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून येमेनमधील हुथी बंडखोरांनी तांबड्या समुद्रात आणि एडनच्या आखाताजवळील प्रदेशात इस्रायल, अमेरिका, ब्रिटन आदी देशांच्या जहाजांवर ड्रोनने हल्ले केले आहेत. तसेच अमेरिकेच्या युद्धनौकांनाही लक्ष्य बनवले आहे. हुथींना इराणचा पाठिंबा आहे. गेल्या रविवारी दहशतवाद्यांनी जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळावर हल्ला केला. त्यात अमेरिकेचे तीन सैनिक मारले गेले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या सेनादलांनी दोन दिवसांपूर्वी सीरिया आणि इराकमधील ८५ दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यात १६ नागरिक मारले गेले होते. त्यापाठोपाठ रविवारी अमेरिका आणि ब्रिटनने नवे हल्ले केले आहेत. त्यात अमेरिका आणि ब्रिटनची लढाऊ विमाने आणि युद्धनौकांनी सहभाग घेतला.

या हल्ल्यांद्वारे अमेरिकेने हुथी बंडखोरांना स्पष्ट संदेश दिला आहे की, त्यांना त्यांच्या कृतीची फळे भोगावी लागतील. गरज भासल्यास आम्ही पुन्हा असेच हल्ले करू, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या जहाजांवर करण्यात आलेले हल्ले अस्वीकारार्ह आहेत. निष्पाप नागरिक आणि त्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. रॉयल एअरफोर्सच्या टायफून विमानांनी रात्री येमेनमधील हुथींच्या तळांवर हल्ले केले आहेत. त्याने हुथींची लढण्याची क्षमता कमी झाली आहे. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड कॅमेरून यांनी स्पष्ट केले की, इराणला हुथींना मदत केल्याची किंमत मोजावी लागेल. अमेरिका आणि ब्रिटनने येमेनमध्ये हुथींच्या तळांवर हल्ले करून नेमके तेच साधले आहे.

हुथींकडून बदल्याची धमकी

अमेरिका आणि ब्रिटनने केलेल्या हल्ल्यांचा बदला घेतला जाईल, अशी धमकी हुथी बंडखोरांनी दिली आहे. या हल्ल्यांमुळे आम्ही घाबरणार नाही. गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना आम्ही यापुढेही नैतिक, धार्मिक आणि मानवतावादी मदत देतच राहू, असे हुथींनी स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in