

वॉशिंग्टन : अमेरिकेत जन्म घेणाऱ्या बालकांना तेथील कायद्यानुसार अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले जाते. याचा फायदा घेण्यासाठी अनेक जण त्यांच्या बाळाला अमेरिकेत जन्म देण्यासाठी पर्यटक व्हिसा घेतात. अमेरिकेत पर्यटनासाठी गेल्यावर तिथेच प्रसूती झाल्यास जन्मलेल्या बालक अथवा बालिकेला अमेरिकेचे नागरिकत्व मिळते. हे प्रकार रोखण्यासाठी अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने आता पावले उचलली आहेत.
अमेरिकेत मूल जन्मल्यास त्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळते, या उद्देशाने पर्यटक व्हिसाचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास पर्यटक व्हिसा नाकारला जाईल, अशी माहिती अमेरिकेच्या भारतातील दूतावासाने गुरुवारी ‘एक्स’वर दिली आहे. अमेरिकेन दूतावासातील अधिकाऱ्यांना याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.
जन्मसिद्ध नागरिकत्व
अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा असून त्याद्वारे अमेरिकेत जन्म घेणाऱ्यांना अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले जाते. या कायद्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध आहे. ट्रम्प यांनी, जन्माने मिळणारे नागरिकत्व रद्द करण्याचा निर्णय जानेवारी २०२० मध्ये घेतला होता. परंतु, या निर्णयाविरोधात काहींनी फेडरल न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे तो निर्णय स्थगित करावा लागला होता. ट्रम्प यांनी सत्तेत आल्यानंतर अमेरिकन व्हिसाबाबत अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.
अमेरिकेच्या भारतातील दूतावासाला बी-१ व बी-२ या पर्यटक व्हिसांचा वापर अमेरिकेत मूल जन्माला घालून अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी केला जातो, असा संशय आहे. जानेवारी २०२० मध्ये ट्रम्प प्रशासनाने व्हिसाबाबत कडक नियमावली जारी केली होती. वैद्यकीय कारणांसाठी व्हिसा देताना आर्थिक क्षमता व खरंच वैद्यकीय उपचारांची गरज आहे का, याची पडताळणी करण्याचे आदेश कॉन्सुलेट अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. अमेरिकेत होणारे कायदेशीर व बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्वाचे मानले जाते.