डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी अनैतिक पद्धतीचा वापर,हजार कोटींचे वैद्यकीय व्यावसायिकांना भेट

मायक्रो लॅब्स लिमिटेडशी संबंधित नऊ राज्यांमधील ३६ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हा दावा केला आहे
डोलो-६५० गोळ्यांच्या विक्रीसाठी अनैतिक पद्धतीचा वापर,हजार कोटींचे वैद्यकीय व्यावसायिकांना भेट

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलेल्या ‘डोलो-६५०’ गोळ्यांच्या विक्रीसाठी निर्मात्यांनी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचा तसेच गोळ्यांची प्रसिद्धी करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना जवळपास हजार कोटींचे गिफ्ट देण्यात आल्याचाही आरोप केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) केला आहे. प्राप्तिकर विभागाने ६ जुलैला बंगळुरुमधील मायक्रो लॅब्स लिमिटेडशी संबंधित नऊ राज्यांमधील ३६ ठिकाणी छापे टाकल्यानंतर हा दावा केला आहे.

औषध निर्मात्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने एकूण १ कोटी २० लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे.तसेच १ कोटी ४० लाखांचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी मायक्रो लॅब्स लिमिटेडने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

तपासादरम्यान कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या रूपात अनेक भक्कम पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुराव्यांची छाननी करण्यात आली असता वैद्यकीय व्यावासायिकांना विक्री आणि बढतीच्या नावाखाली गिफ्ट देण्यात आल्याचा उल्लेख आहे. डॉक्टर तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना प्रचार, सेमिनार, वैद्यकीय सल्ला अशा शीर्षकांखाली आपल्या कंपनीच्या उत्पादनांची प्रसिद्धी करण्यासाठी प्रवास खर्च, भेटवस्तू दिल्या जात होत्या, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली.

खपासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब

पुराव्यांवरुन ग्रुपने आपली उत्पादने आणि ब्रँडची प्रसिद्धी करण्यासाठी अनैतिक पद्धतीचा अवलंब केल्याचे उघड झाले आहे. मोफत देण्यात आलेल्या या गोष्टींची किंमत जवळपास १ हजार कोटी आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या निवेदनात या ग्रुपचा उल्लेख नसला तरी सूत्रांच्या माहितीनुसार, हे मायक्रो लॅब्स लिमिटेडशी संबंधित आहे.

डोलो-६५०’चा खप कोरोना काळात वाढला

कोरोना काळात डॉक्टरांकडून आणि मेडिकल दुकानांमध्ये ताप आणि वेदना कमी होण्यासाठी ‘डोलो-६५०’ गोळी घेण्याचा सल्ला दिला जात होता. २०२० मध्ये कोरोनाचे संकट गडद झाले. त्या कालावधीत ३५० कोटी टॅबलेट विकल्या गेल्या होत्या. त्या एकाच वर्षात कंपनीने जवळपास ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती. डोलोची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्स कंपनीचा नफा प्रचंड वाढला. त्यामुळे कंपनी आयकर विभागाच्या रडारवर आली. त्यानंतर आता डोलो-६५० बद्दल आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in